मला सायकलस्वार म्हणून ओळख मिळायला सुरुवात झाली २०११ सालच्या क्रीडा भारतीने आयोजित केलेल्या उज्जैन-डोंबिवली मोहिमेमुळे. अगदी साध्या सायकलवरून सायक्लवणाऱ्या सायकलस्वारांचा भार होता. केटू सायकलस्वारांशी तेव्हा परिचय झाला. आणि नतंर तो येत राहिला. डोंबिवलीत विशिष्ट प्रकारच्या सायकलचे दुकान नव्हते. उज्जैन च्या पराक्रमानंतर ॲक्ट११० आणली. ती हायब्रीड प्रकारची होती. ती ठाण्याहून आणली. अणजूर मार्गे होडीतून! डोंबिवली सायकल क्लबमुळे हा होडीमार्ग आमच्या नित्याचा होता.
सगळीकडे निश्चिंतपणे ठेवून आपापले काम करता यावे म्हणून एका वर्षाने घोडा सायकल घेतली. पुढे, गावातल्या गावात अश्वशक्तिधारी वाहन वापरणार नाही, असा वर्षभराचा संकल्प केला तेव्हा घोडा सायकलने खूप साथ दिली. हायब्रीड कधी नादुरुस्त असली की घोडा सायकलचा चांगला आधार असायचा.
घोडा सायकल वर डोंबिवली-नेरळ-डोंबिवली करतांना दोन लक्षात राहण्याजोगे चढ म्हणजे अंबरनाथ कडे पोहचतांना आणि बदलापूर सोडतांना लागणारा. ते दोन्ही चढ न थांबता चढणे घाम काढायचे.
मग हायब्रिड सायकल वर माथेरान चढणे असो वा, खंडाळ्याचा, इगतपुरीचा घाट चढणे असो. कमीतकमी लो गिअर वर अधिकाधिक कठीण-खडे चढ चढण्याचा प्रयत्न केला; चढतांना वेगाकडे लक्ष न देता सायकल स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले
की,
दम पायात लागतो. सायकल कुठलीही चालू शकेल असा प्रत्यय येत होता.
अजूनही अनेक जण साध्या सायकलवर भारत भ्रमण, जगभ्रमण करतात. त्यावेळी त्यांना प्रेरणा कोण देत असतं? मला वाटतं, ध्येय!
त्यामुळे, माझी सायकल कुठली आहे? याचा विचार न करता, मी असलेली सायकल पूर्ण प्रयत्नांनिशी चालावतो आहे का? यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे असते.
The type of bicycle is just a mind game when your goals are clear.
मी क्राॅस आणि हायब्रीड सायकली वापरत असलो तरीही माझ्याकडे एक घोडा सायकल आहे. तिला पळवण्यात वेगळी मजा आहे.
ही नाण्याची एक बाजू आहे.
दुसरी बाजू-
सायकल- म्हटले तर सगळ्यात स्वस्त आणि म्हटले तर सगळ्यात महागडे वाहन आहे. प्रत्येकाची खर्च करण्याची प्राधान्ये निराळी असू शकतात. हे सांगायचं कारण, परवा मित्राने चांगली टोरंटो घेतली. ते ऐकून दुसऱ्याने विचारले, "पैसे वर आले आहेत का?"
आपले ध्येय, गरज, शारीरिक-मानसिक व आर्थिक क्षमता लक्षात घेऊन आपण सायकल ठरवावी. ह्यावर विचार करायला लावला -भारत परिक्रमा केलेल्या सचिन गावकर सरांनी. त्यांना भेटलो, मार्गदर्शन मागितले तेव्हा त्यांनी लेक्चर दिले नाही. पण अश्याप्रकारचे प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे लगेच देता येणे शक्य नव्हते. नंतरच्या प्रवासात ती मिळत गेली. पायात दम असला तरी, ध्येय काय आहे?
खूप शारीरिक कष्ट घेऊन, सायकलच्या डागडुजीत श्रम आणि वेळ घालवून नंतर, शाळेतल्या वर्गात उभं राहता आलं असतं का? मागे लावलेल्या बॅगा सतत पडतायत, त्यांची बांधाबांध करण्यात तारांबळ उडून बरेचदा आतलं सामान खराब होऊन चाललं असतं का? लोकांशी संवाद साधायचा की दया-सहानुभूती मिळवायची? पावसात न भिजता प्रवास वेळेत पूर्ण झाला अहता का?
मागे वळून पाहतांना, असे किती तरी प्रश्न सचिन सरांनी त्यांच्या प्रश्नांवर विचार करायला भाग पाडून सोडवले होते, असे वाटते. माझ्या उद्दिष्टात कुठेही काही उणे पडणार नाही अशी साथही मला बर्गामाॅण्टने दिली. #bergamont
मजा म्हणून सायकल चालवण्याठी किती खर्च करावा आणि एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती करावा? हे प्रत्येकाचे गणित भिन्न असणारंच. सायकल घेतांना ती आपल्या आयुष्यभराची सोबती आहे ह्या भावनेतून घेत असाल तर मात्र आजच्या बाजार भावानुसार गिअर सायकल साठी कमीत कमी २० हजार आणि विनागिअर साठी ८ हजार खर्चायची तयारी हवी. शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस विनागिअरच्या सायकलीत लागतो. तसे घडण्याची-स्वीकारण्याची तयारी हवी.
हायब्रीड सायकल सर्वोत्तम. असा माझा समज आहे. कारण, रोड बाईक पेक्षा नखरे आणि माऊंटन बाईक पेक्षा श्रम कमी लागतात असे मी मानतो. वेगवान सायक्लवण्यासाठी रोड बाईकला पर्याय नाही. आणि खडबडीत चढ उताराच्या- रस्ता नसलेल्या जागांवर चालवण्यासाठी माऊंटन बाईकला पर्याय नाही. भारतीय रस्त्यांवरील सर्वसामान्य वापरासाठी हायब्रीड किंवा क्राॅस सिरीज मधल्या सायकली सर्वोत्तम हे माझे वैयक्तिक मत आहे. ते व्यक्तिगणिक बदलू शकते.
BRM करण्यासाठी रोड बाईक असावी असं मला वाटतं. क्लिट्सचे शूज, वातावरोधसाही (aero-resistant) शिरस्त्राण, नखहीन हातमोजे, पाठीवरची पखाल, ह्या साऱ्या आभूषणांनी नटून कानात वारा भरून सायक्लवणं हे एखाद्या सायकलस्वाराचं स्वप्नच!
तात्पर्य हेच, की त्या त्या ध्येयासाठी ती ती सायकल योग्यच!
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांवर चिंता करू नये. जसे रस्ता! तो आहे तसा आहे. आणि त्यावरूनच मला माझं ध्येयं गाठायचं आहे. मग आपली सायकल त्या रस्त्याला मनाने अनुकूल करवून घेणे अधिक सोयीचे. "श्रुतञ्चैव यत् कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्"- "त्या ध्येयापर्यंत पोहचायचा रस्ता काट्यांनी भरलाय असं ऐकलंय. पण, स्वतःच ते ध्येय निश्चित केल्याने मी तो रस्ता अगदी सहज पार करण्याजोगा बनवीन."
मोठ्या ध्येयांसाठी मोठी-महागडी सायकल. पण, त्या बरोबर येणारी आव्हानेही तितकीच मोठी. कारण, सायकल काही नुस्ती आरामाची चैन नसते, तर ती असते श्रमांच्या चैनीसाठी बनलेले साधन...
#21dayschallenge #dombivlicycleclub #pedalrepublic #Cycle2Work #udaipur #dharohar #सायकलोपासना #cyclopasana
सौर चैत्र २० शके १९४५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा