सायकलसहल यशस्वीरित्या पार पडली. पंधरवड्यापूर्वी कौशिक बरोबर झालेला फोनवरील संवाद आठवला. मी हादरलो होतो. पण सावरायचं म्हणून कौशिकला फोन करून प्रसंग कथन केला.
अशीच एका शाळेची सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल पंढरपूरला जात होती. दिवसभरात शंभर-सव्वाशे किलोमीटरचा पल्ला होता. पुढे एक दादा, मागे एक दादा. शेवटी एक टेम्पो देखील होता. मध्ये एका रांगेत सारे विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने, रस्त्याच्या डाव्या बाजूनी सायक्लवत होते. पंढरपूर पासून वीस किलोमीटरचं अंतर राहिलं असावं. तासा दीड तासाने चंद्रभागेच्या किनारी विठूरायाचं दर्शन होणार याचा विचाराने सगळ्यांच्याच मनात आनंद खुलत होता.
समोरून एखादी गाडी आपल्या अंगावर येईल असं कुणाला वाटायचं काहीच कारण नव्हतं. सगळेच डाव्या टोकावरून चालले होते. पण. एक टेम्पो ट्राव्हलर जोरदार वेगाने समोरून आली, लेन कापत परस्पर एका छोट्या सायकलस्वाराला धडक देऊन थांबली.
नववीत शिकणारा तो विद्यार्थी. काही फूट उडून फेकला गेला. स्वतःच्याच शरीरातून वाहणारं रक्त पाहत वेदनांनी कळवळत रस्त्यावर पडला. इतर गाड्या थांबल्या. लोकं जमा होऊन कुजबूज करू लागली. त्याच्या मित्रांनी दादाला आवाज दिला. सगळीच मुलं घाबरली होती. दादाला त्याच्या जवळ पोहचे पर्यंत दीड मिनीटाचा अवधी गेला होता. "आता काही उठू शकत नाही." "किती रक्त वाहतंय." "काही खरं नाही." वगैरे वाक्यांनी बघ्यांची चर्चा रंगत चालली होती.
दादाने प्रसंगावधान दाखवून त्याला तत्काळ उचलून एका गाडीत ठेवलं. वाहन चालकाला लोकांनी आडवून धरलेलंच होतं. वाहातं रक्त थांबवायला पंढरपूर गाठणं आवश्यक होतं. तोवर त्याला शुद्धीत ठेवणंही गरजेचं होतं. गप्पा मारत, इकडचे तिकडे प्रश्न विचारत पंढरपूरच्या इस्पितळात ते पोहचले. संपूर्ण उपचार इथे मिळू शकणार नाहीत हे डाॅक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलं. जमतील तितके प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने दीनानाथ मंगेशकर इस्पितळाची वाट धरली.
दुसरा दादा इतर मुलांना धीर देत पंढरीची वाट पूर्ण करत होता. तिथून शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवलं गेलं. घरीदेखील प्राथमिक माहिती पोहचवली गेली. दीनानाथला पोहचे पर्यंत त्याला शुद्धीत ठेवणं कठीण होतं. रक्तस्रावामुळे तो बेशुद्ध पडला होता. इस्पितळात पूर्वसूचना देऊन ठेवली होती. त्यानुसार थोडी तयारी करून ठेवली होती. एम. आर. आय, एक्स. रे वगैरेचे रिपोर्ट आले. पयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी दुखावली होती. पाय कापायला पर्याय नव्हता.
ही गोष्ट पचवणं कुणालाच शक्य नव्हतं. दादा, मित्र, मुख्याध्यापक, पालक... ही खरी संयम आणि विवेकाची परीक्षा होती.
वास्तव स्वीकारणं.
सगळ्या शस्त्रक्रिया पार पडल्या. तीन दिवस, दोन दादा इस्पितळात येऊन जाऊन चोवीस तास असायचे. त्यानंतर त्या वाहनचालकावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या दादाने घटनास्थळावरून विद्यार्थ्याला उचललं त्याच्या तोंडून मी हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत होतो. पालकांनी सहन केलेला आघात आणि आयोजकांना दिलेलं सहकार्य ऐकून निःशब्द झालो होतो. दादांनी पालकांचा विश्वास कमावला होता म्हणजे नेमकं काय? ते ऐकत होतो.
वाहनचालक सोडून इतर *कोणाची* चूक होती?
दादाने त्याक्षणी सगळे विचार सोडून देऊन घेतलेला निर्णय आणि केलेली कृती आपण अश्या वेळी करू शकू का? पालकांनी दादा आणि शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरलं असतं तर? पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाल्यांना सायकलसहलीला पाठवावं असं आपण नेहमी सांगतो. पण, अश्या वेळी पालकांना भावनाह्वेग आवरता आला नाही तर?
मी स्वतः स्वतःचं मरण कमी वेळा का जवळून बघितलंय?
वेगाच्या हाव्यासाने एका क्षणात एखाद्या चिमुरड्याचं भविष्य हिरावून घेणाऱ्या वाहनचालकाला काय शिक्षा होईल? आपली न्यायव्यवस्था शिक्षा करू शकेल का?
ओलावलेल्या डोळ्यांसह असंख्य प्रश्नांचं रणकंदन डोक्यात माजलं होतं.
दादा म्हणून आपण मनाने खंबीर असायलाच हवं. अश्या प्रसंगांसाठी हजरजबाबी व्हायलाच हवं. सायकलसहलीची जबाबदारी पालकांचा विश्वास कमावत सुरू होते. हा प्रसंग कोणावरही कधीही कोसळू शकतो.
एवढाच विचार करून कौशिकला फोन लावला होता.
-गंधार.
03/02/2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा