दिवस-63, केलांग 1/9/2018
आनंद आणि दुःख त्या त्या क्षणांपुरते मर्यादित असतात. त्यांच्या अनुभवांचे गोडवे-कडवे नंतर कैक प्रकारे गाता येतात. हे लिखाण हा देखील त्याचाच एक भाग.
रोहतंगच्या पुढे 22 कि.मीचा उतार उतरून कोकसरला पोहचलो होतो. शाळा इथून 13 किमी दूर असलेल्या सिस्सू गावात होती. तसा सकाळी आरामात 8-8.30 ला निघालो. फ्लाॅवर, मुळा आणि विवध पालेभाज्यांनी रस्त्याच्या एकाबाजूचे चढ आणि दुसऱ्या बाजूचे उतार सजले होते. रोहतंगचा पास पार केल्यावर अशी विविध रंगी जीवसृष्टी 35-40 कि.मी च्या प्रवासानंतर बघायला मिळाली.
एरव्ही, बर्फ वितळून गेल्यावर नागडे पडलेले डोंगर माथे, बर्फाचा भार असह्य होऊन भूंस्खलनाने भूसभूशीत राहिलेले डोंगर उतार, यांवर एका पट्ट्यावर लालसर रानगवत माजलेलं होतं. काही ठिकाणी नव्याने अंकुरू पाहणारी देवदाराची रोपं डोकं वर काढू पाहत होती. बाकी सर्वत्र रखरखीत डोंगर उतार.
त्यांतल्या त्यात उंच पहाड अजूनही हिमाच्छादित होते. सूर्य ते सौंदर्यही हिरावून घेतांना 500-600 फूटांवरून कोसळणारे धबधबे निर्माण करून नकळतपणे सौंदर्यच निर्माण करत होता. तसा या पाण्याचा प्रवास फार किचकट नव्हता. सरळ खाली वाहणाऱ्या चंद्रा नदीतच त्यांना जायचं होतं. सूर्याच्या किरणांना टाळत पहाडाडून लपलेल्या पाण्याला गोठवण्याचं काम वारा मात्र चोख बजावत होता. मोत्याचा एकसर धारण केलेली पृथ्वी ही कविकल्पना शब्दशः अनुभवता येत होती. मेंढपाळ येणाऱ्या हिवाळ्याच्या तयारीसाठी शेळ्यामेंढ्यांचे कळप डोंगरापलिकडे, मनालीला घेऊन जात होते. त्यांनी रस्ता भरला की पाच मिनीटे आहोत तिथेच उभे राहायची आता सवय झाली होती. शांत मेंढरं. आपापसात खेळत असतांना रक्तवर्णी शीरास्त्र(हेल्मेट) घातलेला मी आणि पंचवीस किलो सामान वाहणार्या #bgm #bergamontindia #straightfromstpauli बघून गोंधळून जात आणि सैरावैरा पळत बाजूने वाट काढत.
सिस्सूच्या शाळेत गेलो. छोटं गाव. कमी वस्ती. त्यात आज एक लग्न होतं. शाळेत मुलं आली नव्हती. जेमतेम 30 विद्यार्थी, आठवी पासून बारावी पर्यंतचे! त्यांच्याशी आणि शिक्षकांशी संवाद साधला तेव्हा लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील शिक्षणा विषयी बरीच माहिती मिळाली.
ऊन तापत होतं. बर्फावरील गार वारा त्याला थंड करत होता. चंद्रा नदीच्या काठाने जाणारा रस्ता संपणार होता. एका संगमापाशी येऊन थांबलो. इथे चंद्रा आणि भागा एकत्र येतात. या गावाला तंडी असं नाव आहे. तन दिले गेले ज्या ठिकाणी ते तंडी. अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. द्रौपदी ने या ठिकाणी जलसमाधी घेतली अशी लोककथा ऐकायला मिळाली.
पुढचा रस्ता भागा नदीच्या किनाऱ्याने सुरू झाला.
हा प्रवास नर्मदेसारखाच उलटा, मूळांपर्यंत जाणारा होता.
मी जात कुठे होतो? तर, या सगळ्या उपनद्या ओलांडत सिंधू नदीकडे...
जिच्यामुळे मी हिंदू म्हणून ओळखला जातो, जिच्यामुळे या भरतभूमीला इंडिया हे नाव मिळालं, जिचा शोध घेतांना इतर खंडातल्याही अनेक भागांना आणि जातींना चुकून इंडिया आणि इंडियन हेच नाव दिलं गेलं, त्या सिंधू नदीकडे जाणारा प्रवास!
मी केलांगला पोहचलो तेव्हा दुपारचे 2-2.30 झाले होते. थेट उच्च माध्यमिक शाळेचा वेध घेतला. शनिवार होता. अर्धा दिवस वगैरे शाळा असायची भिती. नशीबाने तसं काही नव्हतं. नववीच्या वर्गात संवाद साधला. मुलांना विषय आवडला. मुलं छान खुलून प्रश्न विचारत होती. मीही फोन काढून फोटो वगैरे काढायला विसरलो. नंतर मुख्याध्यपकांना भेटलो तेव्हा त्यांच्या बरोबर मात्र न विसरता फोटो काढला. आता पांग ला पोहचेपर्यं शाळा असणार नव्हती. केलांगमध्ये 100% बौद्ध वस्ती असल्याने भाषा आणि उच्चारण यात बराच फरक जाणवला. भोटी भाषेविषयी तुरळक माहिती मिळाली.
#सायकलोपासना #cyclopasana #pitambari
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा