संस्कृत शिकायला सुरुवात करून एक तप पूर्ण झालंय. मागचं संपूर्ण वर्ष तपोपूर्तीचं वर्ष होतं. मागच्यावर्षी जानेवारी-मार्च महिन्यात भारतभ्रमणाचे विचार आल्यानंतर "ह्याच वर्षी निघायला हवं" यावर मनाने शिक्कामोर्तब केला तो केवळ 'तपोपूर्ती'चे औचित्य साधून.
दोन वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेला टीचर पासून बाईंपर्यंत हे मनोगत लिहीलं होतं. तपोपूर्तीचे वर्ष संपतांना यात 'आणि आता माताजी' याची भर पडली आहे. गुरुपौर्णिमेला एका गुरुकुलात, गुरुसान्निध्यात राहून शिकण्याचा अगदी न ठरवता घडून आलेला हा योग आहे.
टीचर पासून बाईंपर्यंत... आणि आता माताजी.
पुण्यातला एक किस्सा जो नावानिशी सांगायला खूप अभिमान वाटतो; कारण त्याने भाषेच्या अभ्यासाविषयी एक दृष्टी दिली आणि भाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. तो आजच्या निमित्ताने लिहितो.
मांडे बाई, कात्रे बाई, गाडगीळ बाई यांचे तास संवादात्मक असायचे. प्रत्येक विषयावर चर्चा व्हायची. प्रश्न विचारले जायचे, मतं घेतली जायची आणि बरेचदा तास कधी संपायचा हे बाईंनी सांगितल्या शिवाय समजत नसे. पहिल्या दोन सत्रांत सर्वात जास्त ओरडा ज्याला मिळाला किंवा ऐकून घ्यावं लागलं तो कदाचित् मीच असीन!
कारणही तसंच होतं. एखादा विषय समजणं सोपं असतं. पण त्यावर चर्चा करतांना तोच समजवणं, महाकठीण. तेही कदाचित मुंबईत सोपं गेलं असतं. पण, पुण्यात नाही.
"तुम्हा मुंबईतल्या लोकांना एका भाषेत अभिव्यक्त होता येत नाही का?" "एकतर मराठीतून बोल, किंवा इंग्रजीतून." विषय संपला!
हे पहिल्या वर्षात वेगवेगळ्या शब्दांत कित्येकदा ऐकलंय, याची गणना नाही.
गाडगीळ बाई आणि मांडे बाई एकदा एका भाषेतून शिकवायल्या लागल्या की अस्खलित एकच भाषा बोलतात. सुरूवातीला कठीण वाटत होतं. पण सवय झाली मग.
या सगळ्यात, माझ्या डोंबिवली-पुणे-डोंबिवली प्रवासाने विचार करायला खूप छान वातावरण दिलं होतं. खरंच होतं, अर्धवट जाणल्या गेलेल्या भाषेने संवादात परिपूर्णता येणे शक्यच नव्हते.
एकदा गाडगीळ बाई संपूर्ण वर्गात माझं बोलणं मधेच थांबवून, मला बोलल्या. कुठेतरी लागलं! ट्रेन मधे ठरवलंच अस्खलित मराठी बोलायचा सराव रोजच्या भाषेच्या वापरात करायचा.
डोंबिवलीतल्या मित्रांना त्याचा त्रास होत होता पण नंतर त्यांनाही सवय झाली असावी.
दुर्दैवाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो होतो आणि शिक्षण संपताना मात्र सुदैवाने संपूर्ण मराठी माध्यमातला विद्यार्थी बनलो होतो. इंग्रजी बद्दल आता किंचिदपि द्वेष नव्हता आणि त्या भाषेशी संपर्क तुटू नये म्हणून डोंबिवली ते कर्जत इंग्रजी वृत्तपत्र वाचायचा संकल्प केला होता.
बाकी या संकल्पाने आपण भाषांच्या किती जवळ जाऊ शकतो याची स्वतःलाच नव्याने जाणीव झाली. म्हणून क्लास सुरू करतांना "एका भाषा सम्यक् अध्येतव्या" हे एकच सूत्र रुजावं एवढं ध्येयं ठवलं.
गुरूंनी पिळलेले कान आणि त्यातून घडलेलो मी या बाबतीत इतरांना बि घडवायची इच्छा जागृत ठेवतो.
संस्कृत शिकायला सुरुवात करून आता दहा वर्ष झाली.
शालेय अभ्यासक्रमातील मथितार्थ पोहचवणा-या अस्मिता टीचर, काळे मॅडम, दंडगे मॅडम;
महाविद्यालयात पारंपारिक संस्कृत बरोबरच नवनवीन संशोधनात्मक विषय माझ्या पर्यंय पोहचावेत म्हणून नेहमी झटणाऱ्या वैष्णवी मॅडम आणि पुणे विद्यापीठातील रसाळ सर, अनघा जोशी बाई, कात्रे बाई, मांडे बाई आणि गाडगीळ बाई या संस्कृत क्षेत्रातील माझ्या सर्व गुरूंना आजच्या निमित्ताने अभिवादन!
............................2017.........................
दोन हजार पाच साली डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या डाॅ. पुष्पा दीक्षित ज्यांना, सगळेच विद्यार्थी माताजी म्हणतात, त्यांच्या बिलासपुर येथील घरी-गुरुकुलात मी मागील तेवीस दिवसांपासून राहतोय.
शाळा-महाविद्यालय-विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या आपणा शहरी मंडळींना इथल्या जीवना विषयी किंचिदपि कल्पना नसल्याची खात्री बाळगून पुढचं लिखाण करतो आहे.
प्रवासामध्ये मी अतिथी म्हणून अनेक गुरुकुलांना भेटी दिल्या. बहुतांश गुरुकुलं वेदाध्ययनाविषयीची होती. रुद्री, पुरुषसूक्त, कर्मकांड यांचं अध्ययन आणि आपापल्या शाखेच्या रक्षणासाठी वेदांचं रटन हा सर्वसामान्य सार्वत्रिक अभ्यासक्रम. बेलोरा-अमरावती, सामख्याळी-गुजरात आणि काणकोण-गोवा येथील अपवाद वगळता सगळीच गुरुकुलं मंदीरसंस्थांशी जोडलेली होती. पैकी, गोव्यातील गुरुकुलात शास्त्राध्ययन होत होतं. कर्नाटकातील मठसंस्कृती गुरुकुल परंपरेचाच एक आधुनिक प्रयोग होता. जिथे राज्यसरकारने निश्चित केलेला पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना मठातच असलेल्या शाळेत शिकवला जात होता. संस्कृतच्या अभ्यासाला विशेष महत्व असल्याने दहावी-बारावी नंतर शास्त्राध्ययनासाठी संस्कृत पाठशाळेचा वेगळा वर्ग या मठाचाच भाग होता.
त्या सगळ्या गुरुकुलांपेक्षा माताजींचं गुरुकुल व्याकरण शास्त्राध्ययपाच्या उद्देशाने वेगळं आहे.
"जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यासनिश्चयः।
एकाग्रता महत्वेच्छा एतत्विद्यार्थीलक्षणम्॥"
या विद्यार्थी लक्षणांची परीक्षा गुरुकुलात रोज होत असते. वरील लक्षणांपैकी गुरुनिष्ठा हा गुण सोडल्यास इतर सगळ्या गुणांचा अनुभव आपण शिक्षण घेतांना घेत असतो. गुरुनिष्ठा आणि गुरुसेवा या दोहोंमुळेच गुरुकुलातलं जीवन इतर शिक्षणापेक्षा वेगळं आहे. घरातलं बागकाम, स्वयंपाक, धूणी-भांडी, स्वच्छता, बाजार-हाट ह्या सगळ्या गोष्टी गुरुसेवा म्हणून करत
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥
प्रश्न विचारत, जिज्ञासेची पूर्ती करत विषयातील तत्त्व जाणलेल्या गुरूंकडून योग्य ते मार्गदर्शन मिळवणे हे गुरुकुलातील अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे.
माताजी सनातनी विचारसरणीच्या आहेत. बाजारातून रेडीमेड खाद्यपदार्थ वगैरे आणण्याचे त्यांना पटत नाही. पोषाखात धौतवस्त्र अनिवार्य. सकाळी पाचला उठून, आदल्या रात्री वाटून दिलेली साफसफाईची कामं पूर्ण करून स्नानादी शुचिर्भूत होण्याची कर्म आटोपून सात वाजता सूत्रपाठ आणि धातुपाठ सुरू होतो. तासाभराच्या पठनानंतर आरती आणि न्याहारी झाल्यावर नऊ वाजता नवीन शिकण्याचा वर्ग सुरू होतो. दिवसभराचा अभ्यास देऊन झाल्यावर संध्याकाळी दिवस भरात झालेल्या अभ्यासाची परीक्षा होते.
गुरु मार्गदर्शन करत असतात. अधून मधून शिकवतही असतात. अभ्यास करून प्रश्न विचारला गेला नाही तर; आणि रोज होणाऱ्या परीक्षेत नापास झालो तर आपण नवीन आलेल्यांच्या वर्गात (पुन्हा पूर्वीचंच शिकायला) जाऊन बसतो. "पासींग मार्क्स 100 होते है, पासींग मार्क्स 99 नही होते," असं माताजी नेहमी सांगतात. आपल्यापेक्षा अधी शिकलेले वयाची मर्यादा न ठेवता आपल्याला शिकवत असतात आणि आपण पुढे गेल्यावर नवीन येणाऱ्यांना शिकवण्यासाठीच शिकायचं असतं. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या भारतीय परंपरेचा ज्ञानसाठा जीवंत राहिला, तो असाच. वयाने लहान असणाऱ्यांबरोबरच्या आणि आमच्या बरोबरच्या व्यवहारात माताजी भेद करतात. अनुशासन बनून रहावं म्हणून उठता बुक्की बसता लाथ आणि परीक्षेत चांगली उत्तर दिल्यावर, चांगलं काम केल्यावर आंबा, केळ, चाॅकलेट वगैरे बक्षीस मिळणं हे लहान विद्यार्थ्यांसाठी नित्याचं असतं. वयाने मोठ्या असलेल्या आम्हाला शाब्दिक टोमण्यांचा मारा पुरून उरतो. माताजींचं व्याकरणशास्त्राला स्वतःचं देणं आहे. चार हजार सूत्रं समजावून सांगत दोन हजार धातूंवर प्रक्रिया करण्याची नवीन शैली त्यांनी विकसित केली आहे. अष्टाध्यायी शिकणं सोपं नाही. पण म्हणून कुठलाही पंडीत सूत्र बाद करायला धजावला नाही. कुठलं सूत्र आधी शिकावं आणि कुठलं नंतर ह्यात आजवर विविध प्रयोग होत आले आहेत. ळकाराचं उच्चारण आधुनिक संस्कृतात उत्तरभारतात लोप पावलं असलं तरी दक्षिणभारतात ते जीवंत आहे, ज्यामुळे उत्तर भारतीयांनी बनवलेलं "ळकारस्य डकारः..." वगैरे वार्तिक प्रत्यक्षात फोल ठरतं. सांगायचा मुद्दा असा की, माताजी जे शास्त्र शिकवतात ते सोप्पं असल्याचा कुठलाही दावा त्या करत नाहीत. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनाच त्यांच्या पद्धतीने शिकतांना ते सोपं वाटू लागतं. जे कठीण आहे ते कठीणच आहे. अभ्यास करून, प्रसंगी जरासे पाठांतर करून हळू हळू समजून घेत त्याला सोपे करणं हे शिक्षण शास्त्राचं तत्त्व गुरुकुलपद्धतीला समजलंय.
ते अजून आधुनिक शिक्षण तज्ज्ञांचा गावी फिरकत नसल्याचं दोन वीस बवीस सारख्या 'सोपे' करण्यावरून दिसून येतं.
आठ ते बारा वयोवर्षाचा बटू घर सोडून गुरुगृही अध्ययन करायला येतो. पुढील बारा वर्षात विविध शास्त्रांमध्ये पारंगत होण्यासाठी गुरु आपल्या शिष्यावर मेहनत घेतो. एक गुरु घडविला जात असतो. ह्या शास्त्राध्ययनाच्या स्वरूपात पैसा बसत नाही याचा प्रत्यय तिबेटी विश्वविद्यालयाच्या भेटीतही आला होता.
नोकरी करायची पैसा कमवायला. पैसा कमवायचा मुलांना चांगलं शिक्षण द्यायला. पैसा नसेल तर चांगलं शिक्षण नाही? कर्ज काढून शिक्षण घ्यायचं. शिक्षण संपल्यावर काढलेल्या कर्जाचं आणि खर्चिलेल्या पैश्याचं भांडवल करत भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी पैश्याच्या मागे लागायचं... याच पैश्याने वैद्यक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आतून पूर्णपणे पोखरलं गेलंय. कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय भारत?
आज माताजींना गुरुदक्षिणा विचारली. विद्यार्थ्याकडून पैसे घेणार नाही म्हणून माताजींनी पैसे घेण्याचे नाकारले. दीक्षित दांपत्यांनी स्वतःची सगळी मिळकत ह्या गुरुकुलाला चालवण्यासाठी देणगी म्हणून दिली आहे. माताजींच वय पंचहात्तरी पार आहे तर बापूजींच वय पंच्याऐंशी पार. माताजी सवतःच्या घरात आम्हा 15-20 विद्यार्थ्यांना सांभाळतातच. त्याच बरोबर अर्धांगवायूने अधू होऊनही स्वतःची कामं स्वतःच करण्याचा अट्टहास करणाऱ्या बापूजींची सेवाशुश्रूषा करतात. काही वर्षांपुर्वी घरातल्या आणखीन एक सदस्या ज्यांना सगळे फुवा म्हणतात त्यांचा एक पाय काही आजारामुळे कापावा लागला. त्यांची शुश्रूषा माताजीच करतात. वीस वर्षांपूर्वी पाणिनीय शोध संस्थान ही संस्था निर्माण झाली. या संस्थेच्या कर्त्या करवित्या माताजीच. दोन कामचुकार मोलकरिणी मदतीला असल्या तरी सकाळचा सगळ्यांसाठीचा नाश्ता कित्येकदा माताजींना स्वतःच्या हाताने करावा लागतो. सकाळची वेळ पाठांतरासाठीची असल्याने विद्यार्थ्यांना त्या सांगत नाहीत. गुरुकुलातला उत्तम गुरु हा आईची ममता आणि शिक्षकाचे कठोतरत्व यातील योग साधतो. माताजी आणि बापूजींनी प्रोफेसर म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर आपलं सारं संचित केवळ संस्कृत पाठशाळा चालवण्यासाठी अर्पित केलं. आज संस्थेला कोणी ठोस उत्तरदायी नसला तरी असंख्य विद्यार्थी माताजींकडून प्राप्त केलेले ज्ञान घेऊन भारतभर पसरले आहेत, काही भारताबाहेरही गेले आहेत. अध्ययन आणि अध्यापनाचा गुण स्वतःत भिनवून इथून बाहेर पडलेला विद्यार्थी जिथे जातो तिथे जिज्ञासू विद्यार्थ्याच्या शोधात असतो...
हे गुरुकार्य आहे. ते पुढे चालू राहण्यासाठीच आशीर्वाद मागायचे असतात आजच्या दिवशी...
गुरुपौर्णिमा, शके 1941
ख्रिस्ताब्द- 2019
उत्तम लिहिलंय. गुरुकुल पद्धतीचं वैशिष्ट्य हे की इथं ऑप्शनला काही टाकता येत नाही. म्हणूनच ही पद्धत परफेक्ट आहे.
उत्तर द्याहटवाकठीण गोष्ट ही कठीणच असते पण तीचा अभ्यास करून व पाठ करून ती साध्य करता येते. वाह, फारच छान व थेट.
उत्तर द्याहटवा