मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

इंटरसिटी

आज इंटरसिटी मला न घेताच निघून गेली. डोंबिवलीहून सुपरफास्ट चं तिकीट काढणारा एक प्रामाणिक ग्राहक आज रेल्वेने गमावला. काल संध्याकाळपासून ज्या प्रवासाच्या विचाराने मन प्रसन्न झालं होतं. अनेक विचार लिहीण्याच्या प्रतीक्षेत कर्जतच्या अलिकडचा नाला ओलांडून 7.02ने कर्जतला पोहचलो होते. ते सगळंच इंटर्सिटीने सोडवलं. इंरसिटीत एक सुशेगी वलय (कम्फर्ट झोन) होतं. तिथल्या रोजच्या प्रवाश्यांबरोबर ते तिथेच राहणार होतं. आज ते मला सोडून गेलं होतं. दीड वर्षांनंतर आज पुण्याचा प्रवास करत होतो. जून पासून लादलेला हा निर्णय आज गाडी सुटल्यानंतर समजला. नाहीतर, कमी वेगातल्या इंटर्सिटीत तयारीनिशी चढलोच असतो. मागनं येणाऱ्या विशाखापट्टनम् एक्सप्रेसयच्या सामान्य डब्यातून प्रवास सुरू आहे.
खंडाळ्याचा घाट, पावसाने वितळवला, सह्याद्रीचा काळा खडक पावसाने पाझरवला... अत्यंत संथ गतीने गाडी घाट चढायचा प्रयत्न करते आहे. गाडीच्या वजनाने रूळाखालची खडी वाजते आहे, खडी खालील माती ढसते आहे. यंदा पहाड वितळवणारा पाऊस झालाय. बोगद्यावरून गाडीवर धबधबा पडतोय. जामरुग ट्रॅक्शन पासून ठाकुरवाडी पर्यंतचा भयावह प्रवास झाल्यावर ठाकुरवाडी नंतर गाडीने वेग घेतला. सप्टेंबर संपत आला, पितृपक्ष संपत नवरात्र तोंडावर आले तरीही पावसाने परतीची वाट धरली नाहीये. गाडीबाहेरचं वातावरण पावसाळी, आह्लाददायी आहे. उजवीकडच्या डोंगरावरून रूळाच्या बाजूला धबधबे वाहतायत. दरीत ढग खालच्या नदीवर, शेतांवर विसावलेत. काही उडत वर येत गाडीत शिरू पाहतायत. गाडी वेगाने त्यांना मागे टाकतेय. ढगांचीही गाडी सुटते आहे. ऊन्हाळ्यात भकास पडलेले डोंगर, डोंगरावरील वाळलेले गवत, सुकलेली माती, सगळं सगळं पावसाळ्याने नवचैतन्यीत केलं आहे. मंकी हिलच्या पुढे राजमाचीचा डोंगर धुक्याने झाकून टाकलाय. खोल दरीवर कापसाची गादी अंथरली आहे. काळेकुट्ट बोगदे कीर्र आवाज करतायत. त्यांना गाडीही ताल देते आहे. बोगदा, सूर्यप्रकाश न पोहचणारं आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत अनारोग्यदायी ठिकाण, वर्षातून फक्त एकदाच धुतलं जातं. पावसाळ्यात, नित्यशुद्ध पाण्याने!
छएक मोठा बोगदा पार करून गाडी डोंगरमाथ्यावर पोहचते. खंडाळा-एकेकाळचं थंड हवेचं ठिकाण, अर्ध ढगातंच असतं. पुढचा बोगदा पार केल्यावर महामार्ग लागलेला असतो. गाडीच्या मागे लावलेल्या इंजिनचं काम संपलेलं असतं. ते काढण्यासाठी लोणावळ्याचा फलाट तयार असतो.
डेक्कनचं पठार, सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून सुरू होतं. लोहगड विसापूर एरवी अत्यंत रुक्ष दिसणारे हे किल्ले विसापुरच्या धबधब्याने तेजस्वी दिसू लागतात. ते देखील पाण्याने भरलेल्या ढगांना टेकू देत उभे आहेत. कामशेत हे नाव किती पूरक आहे असं दरवेळी वाटतं. बारा महिने वाहणारी नदी, ऊसाची, तांदूळाची शेती, सदा बहरलेली जमीन, चढ-उतारांवर वसलेलं गाव. रूळाच्या दोहो बाजूंना फुललेली केशरी रानफुलं आश्विन महिन्याच्या आगमनाची चाहूल लावत आहेत. ही फुलं पिंपरी चिंचवडपर्यंत साथीला असतात. हिरवळीवर, डोलणारी ही केशरी फुलं निसर्गाचा आविष्कार आहे. गाडी शिवाजी नगरला थांबणार नाही. फार फार तर वेग कमी करेल. तेव्हा गाडीतून उतरायचं. सामान्य डब्यातून प्रवास करण्याचा तोटा एकच की, सहप्रवाश्यांना रोजच्या प्रवासाचा सराव नसतो. गाडी पूर्ण थांबेपर्यंत पुल, बाहेर पडायचा मार्ग मागे राहीलेला असतो. सामान्य डब्यायल्या प्रवाश्यांबरोबर पुढे जाऊन मागे येणं करावं लागतं. असो, रेल्वेने कल्याण-डोंबिवली-बदलापूर मधील प्रवासी संघटनेने केलेल्या कल्याणच्या थांब्याची मागणी तर उडवून लावलीच वरून मुंबई सोडून इतर कुठल्याही गावात राहणाऱ्याला वेळेची किंमत नसते असल्या तोऱ्यात इंटरसिटीचा कर्जतचा थांबाही रद्द झालाय. [वर्तमान आमदार आणि खासदार यांच्याकडे हा प्रस्ताव परित करवण्याचे अधिकार असतात. डोंबिवलीकरांना किती गृहीत धरलंय हे यावरून दिसून येतं!] आता तर मुंबईहून मागचं इंजिन लावून पळवतायत तिला. इंटरसिटी कर्जतला थांबत असतांनाच माझं एम्.ए. झालं यासाठी मी देवाचे आभार मानले पाहिजेत. "मक्तूब" (विधिलिखित) असतं सगळं, नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा