मी सूर्याकडे तोंड करून बसलो आहे. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आहे. सकाळी सव्वासात ची वेळ. वारा वाहत माझ्या डाव्या हाताच्या वर नाक आणि कानाच्या मध्ये आदळतो आहे. हा ईशान्येकडचा वारा हवेत गारवा आणणारा आहे. शिशिर ऋतू आणणारा आहे. या वाऱ्यानेच पाऊस परतवून लावला आहे. वसंत सुरू झाला की या वाऱ्याची दिशा बदलू लागेल आणि पावसाळ्यापर्यंत नैर्ऋत्य दिशेकडून ते वाहू लागतील. तलावाचं पाणी संथ झालंय. त्यात निळ्याक्षार आकाशाचे प्रिबिंब पडलंय. लिलीची फुलं उमलली आहेत. पाणकावळा आणि खंड्या अधून मधून डुबकी मारता आहेत. हे न्याहाळत बसलेल्या माझी इतर पक्ष्यांना सवय झाल्याने त्यांचे आवाजही खुलू लागलेत. पूर्वेकडेच झाडं असल्याने ते दिसत नाहीयेत. पण, हळद्या, सुगरण, बुलबूल, पारवा, कोकीळ, भारद्वाज यांची साथ चिमणी आणि कावळ्याला आहे. चारही बाजूंना कुठे ना कुठे तरी खारूताई आहेतच. काही शांतपणे शिधा जमवतायत तर काही आवाज करून शत्रूंना पळवून लावतायत.
सकाळचा गारवा हळू हळू कमी होऊन दुपारचं ऊन तापू लागेल आणि रात्रीच्या चांदण्यात हवेत पुन्हा गारवा रेंगाळेल. या ऋतूतलं दुपारचं ऊन फार क्लेशदायी ठरतं. कारण सकाळी आणि रात्री बराच गारवा असतो. तापमानातील हा मोठा फरक आपल्या शरीराला सहन करावा लागतो. खरं तर, वट पौर्णिमेनंतर रात्रीचा चंद्र दिसायला कोजागिरी पौर्णिमा उजाडावी लागते. मधले चार महिने मेघाच्छादनाने चंद्रदर्शन दुर्लभ झालेलं असतं. दर्याला उधाण आणणारा चंद्र आपलं काम ढगां आडूनच करत असतो. कोजागिरीचा चंद्र चार महिन्यांनंतर नवीन वाटू लागतो. तो दिसत असला तरी दर्या शांत होताना दिसत असतो. त्या चंद्रावर खूप गारठा आहे. दुपारभराच्या तापलेल्या ऊन्हानंतर त्या चंद्रप्रकाशात थंड केलेलं दूध पीणं शरीराचा सगळा शीण उतरवतं. हा एक दिवसाचा विधी खरं तर संपूर्ण ऋतूभर आचरावा असं आयुर्वेदात सांगितलं आहे. हा ऋतू शरद् ऋतू आहे. हे तेपमानातील चढ-उतारावरूनच जाणवतं.
ह्या ऋतूत पाणी स्फटिकासारखं वर्णग्राही (रंग घेणारं) होतं. तळ सुस्पष्ट दिसू लागतो. हे सगळं कुठेतरी वाचलेलं वर्णन आपण सगळेच अनुभवू शकतो, नाही का? आवश्यकता असते निरीक्षणाची. #सायकलोपासना जोपासली जातांना ह्या निसर्गजाणीवा जपल्या, पोसल्या जातांना निराळाच आनंद देऊन जातात.
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९
ऋतू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा