सोमवार, २ डिसेंबर, २०१९

आवर्ष मेघभेट

2/12/2019
आज मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभर पावसाळी वातावरण होतं आणि मधूनच भुरभूरता पाऊस पडत होता. सहज आठवलं... मागील बारा महिन्यात एक तरी महिना पावसा शिवाय गेल्याचं आठवतंय का?
आनंद मना पासून चेहऱ्यावर खुललं! मागच्या वर्षी, सुमेध-दिपालीच्या लग्नाच्या दिवशी, डिसेंबर मधेच केरळात; नंतर ह्या जानेवारीत सव्वीस जानेवारीला हैद्राबादेत, फेब्रुवारी महिन्यात कलकत्त्यात, मार्च महिन्यात आसाम मध्ये गोलापाड़्यात, एप्रिल महिन्यात मेघालय आणि अरुणाचलात, मे महिन्यात सिक्कीम मध्ये, जून-जुलै दोन्ही महिन्यांत छत्तीसगड़ मध्ये, ऑगस्टपासून महाराष्ट्रात...
अगदी एकही महिना न चुकता मला *मेघ भेटायला येतोय.*
मराठवाडा, दुष्काळी प्रदेश म्हणून दुष्कीर्ती लाभलेला प्रदेश... इथल्या आश्रमशाळांमध्ये जाता येता असंख्य मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन देशाटन करताना दिसतात.  मराठवाडा ही जणू मेंढपाळांचीच भूमी आहे असं एकदा होर्टीच्या शाळेवरून येतांना एका टेकाडावर, तिथून जाणाऱ्या मेंढपाळाकडे बघून वाटलं. खरं तर इथे वेग वगळे समाज आपापले पिढीजात धंदे सोडून वसाहती वसवू पाहत आहेत. त्यात चूक काहीच नसलं तरी, हे वसाहतवादाचं खूळ त्यांना देशोधडीला लवतंय यातील भयानक वास्तविकता दूरदृष्टीरहित सरकारच्या नजरेस नाही पडणार! विकासाच्या नावाखाली पैश्याचं स्तोम माजवणं हा जणू सरकारी धंदा आहे. वसाहती वसवाव्यात इंग्रजाने आणि मिशनऱ्यांनीच! आधी सुनियोजित घरं बांधावीत, इस्पिताळं बांधावीत, धंद्याची सोय करता करता दुसरीकडे शाळा सुरू कराव्यात, पैसा वाढत गेला की कोषागार सुरू करावे. जनतेच्या पोटा पाण्याची, आरोग्याची व्यवस्था झाल्या शिवाय लोकं शिक्षण घेणार कसं? घेतलं तरी, त्यातली गुणवत्ता ते टिकवू कसे शकणार? करोडो अस्पृश्यांमध्ये एकच डाॅ. बाबा साहेब अंबेडकर होऊ शकले,  इतर एक वजा केलेल्या करोडोंचं काय? आणि गुणवत्ता नसेल तर, त्यांना बढत्या मिळायला आरक्षण लागणारच ना. भौतिक- प्राथमिक सुविधा नसतांना बौद्धिक विकास साधला जाऊ शकत नाही हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा कुठे वेडावलेला 'विकास' शहाणा होईल.
असो, त्या विविध जमातीची कामं ऐकून मला द अल्केमिष्ट मधला सॅन्तियागो आठवला नसता तर नवलंच. कोणी 'बुड्ढी के बाल' च्या बदल्यात मानवी केस विकत घेतं. कोणी मृत शरीरांची योग्य विल्हेवाट लावायचं काम बघतं. कोणी गावकऱ्यांच्या गायी चरायला घेऊन जातं तर, कोणी मेंढपाळ असतं-ज्याला शेतातून मेंढ्या घेऊन जाण्याच्या बदल्यात शेतकरी धान्य देतो...  मला ह्या मेंढपाळांचं खूप अप्रूप वाटतं. त्यांच्या स्वरूपात एखादा सॅन्तियागो शकुनांचा पाठलाग करत, मक्तूबावर विश्वास ठेवत आपल्या स्वप्नांच्या शोधात फिरत असेल का? असं नेहमी वाटतं.
शकून-
बाराही महिने न चुकता भेटायला येणाऱ्या मेघाला आता कालिदासानेच ऋतुसंहार समजवावा!

२ टिप्पण्या: