एक आगळा वेगळा आणि सर्वांसाठीच पहिला अनुभव...
राज्यस्तरीय संस्कृत एकांकिका स्पर्धा. आपल्याच कृतीवर नवनवीन प्रयोग करून वरच्या पायर्या चढत जाणं शिकायचं असेल तर टिळक नगर शाळेचा हा प्रयत्न अगदी उल्लेखनीय आणि वाखाणण्या जोगा आहे.
मागच्या वर्षी शालेय पतळीवर सादर करण्यासाठी शाळेतील इतर मुलांबरोबरच दहावीतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली 'संजीवन समाधी' ही मराठी एकांकिका बसवण्यात आली होती. वर्ष सरलं, दहावीत नवीन विद्यार्थी आले आणि त्यांनी स्वतःच्याच उत्सुकतेने या एकांकिकेचा काही भाग संस्कृतात भाषांतरीत केला.
बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्कांच ओझं वाहणारे पालक शिक्षकांबरोबर त्यांच्या पाल्यांवरही क्लासेसचा, टेस्टसिरीज् चा, शाळेतील परीक्षांचा आणि जमलं तर अभ्यासाचा ताण वाट्टेल त्या पद्धतीने मिळेल त्या वेळी नकारघंटा लावत टाकतांना दिसतात. ती फिल्डींग कैक वर्षांच्या आधीपासून दहावीचा काऊंटडाऊन सुरू करून समाजानेच लावलेली असते. वाक्य ठरलेलीच "दोन वर्षावर आली आता दहावी..." वगैरे वगैरे...
इथे जरा परिस्थिती वेगळी असावी असं नाटकाचा प्रयोग झाल्या नंतर जाणवतंय. टिळकनगर शाळेचा आणि माझा संबंध आला प्रबोधिनीच्या उपक्रमांमुळे. सायकल सहली मुळे दहावीतील बर्याच मुलांचा चांगलाच परिचय. त्यांतील सोहम् आणि मी एकाच इमारतीत राहत असल्याने सोहम् च्या बोलण्यात या सगळ्यांचा विषय निघाला की अनोळखी कोणीच नसायचं.
त्याच्याकडून या नाटकाच्या अनुवादाविषयी ऐकून होतो. काही पद्यात्मक अनुवाद करून दिला. केळकर काॅलेज मध्ये झालेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं आणि हीच एकांकिका वाढवून संपूर्ण प्रयोग राज्यनाट्य स्पर्धेसाठी करायचं ठरल्याचं समजलं.
या स्पर्धेबाबत फक्त ऐकून होतो. संस्कृत एकांकिका स्पर्धांमध्ये रा.ना.दांडेकर चषक स्पर्धांपेक्षा कठीण असलेली राज्यस्तरीय स्पर्धा. शाळेला या स्पर्धेविषयी एकूणच गांभीर्य व माहिती असावी ही 'कल्पना' डोक्यात होती. तसा माणूस कल्पनेत रमणारा असतो! मीही त्यातलाच.
डोंबिवलीतील पहिलीच शाळा आपल्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरीय संस्कृत एकांकिका स्पर्धेसाठी उतरवत होती. माहिती कोण सांगणार होतं? कशी सांगणार होतं? बी.एड् च्या अभ्यासक्रमात पुस्तका बाहेरचं काय असतं? नाटकाच्या सुरवातीला घंटा वाजवायला कोण सांगतं? इथपासून स्पर्धेतील कुठल्या बक्षीसांसाठी काम करायचं असतं? सगळाच नाविन्याचा दिव्य प्रकाश!
रविवारी कट्ट्यावर बसलो होतो. रात्री 8.30 वाजता शाळेच्या युनिफाॅर्म मध्ये सोहम् येतांना दिसला तेव्हा ती पूर्ण अनुवादित संहिता बघितली आणि परिस्थिती गंभीर असल्याचे समजले. दहावीच्या मुलांनी त्यांच्या पातळीवर उत्कृष्ट उल्लेखनीय अनुवाद केला होता. पण राज्यस्तरीय पातळीवर, जिथे स्पर्धा सगळ्यांशीच असते, त्यासाठी बरंच काम करावं लागणार होतं. प्रयोग शुक्रवारी होता आणि सोमवारी, संपादन करण्यासाठी मी संहिता मागवून घेतली. आणि माझा तालमीत प्रवेश झाला. हातात फक्त 3 दिवस. मुलांचे संवाद तोंडपाठ होते. पण संपादित न केलेल्या संहितेतले! दिग्दर्शन करण्यासाठी संस्कृत समजणारा दिग्दर्शक असावा ही माझी 'कल्पना' होती. आता शब्दांवर आधारित तालीम सुरू झाली. ऐन वेळेस बदललेले संवाद पाठ केले गेले. त्यातच चालू होते प्रिलीम चे पेपर! भूमितीचा पेपर देऊन तालमीला आलेले रडके चेहरे, तालमीतील आपापल्या पात्रात शिरणे कठीणच!
मला माझ्या दिग्दर्शिकेची आठवण झाली. दोन वर्षापुर्वी मी नाटकात मुख्य नट म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी पात्रात शिरण्यासाठी दिग्दर्शिकेने बजावलेली भूमिका. चांगला दिग्दर्शक हा तालमीतला व्हिलन असतो. तो रंगकर्मींचा मित्र खचितच होऊ शकतो!
सगळ्यांचा दादा म्हणून दादागिरी करत लगाम हातात ठेवण्या खेरीज दुसरा पर्याय उरला नव्हता. वेळ खूपच कमी होता. नाटकाची जबाबदारी शाळेच्या वतीने इंग्रजी विषयाच्या जोशी बाई आणि साठे बाई सांभाळत होत्या.
मुलांचा गट अगदी पक्का होता. रुसवी फुगवी आपापसात नव्हती. नसत्या वेळी आलेल्या अभ्यासाच्या ओझ्याने नाक मुरडलं होतं एवढंच! तसा अभ्यास न करता आता नाटकावर लक्ष केंद्रित करा सांगणारा, मीही होतोच. शाळेने दोन परीक्षांसाठी मुलांना सूट दिली. त्यामुळे आनंद होता. नाटकाचा दिवस उजाडला आणि बस मध्ये पार्श्वसंगीताची चर्चा सुरू झाली. प्रकाश संयोजनासाठी संहिता बाहेरच काढलेली नव्हती. ते on the spot करण्यात आलं आणि नाटक यशस्वी रित्या सादर झालं.
राज्य स्तरीय स्पर्धा किती शाळांपर्यंत पोहचतात? किंवा किती शाळा राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमागे उभ्या राहतात? 'आम्ही दाखवतो तीच पूर्व दिशा' हे मुलांना चांगला नागरिक बनवण्यासाठी घेतलेले पुस्तकी धोरण. पण पुस्तकाच्या बाहेर पडून अनुभव देण्यासाठी आणि घेण्यासाठी आपण एक समाज म्हणून शालेय मुलांच्या मागे उभे राहण्यासाठी किती सकारात्मक विचार करतो?
की, मार्कं, रँक, पगार आणि समाज याची भिती दाखवत पायखेच करणे एवढेच आपले सोयीचे routine बनले आहे?
आमच्या नाटकाने पुस्तकाच्या बाहेर पडून आधीच बक्षीस जिंकलंय! स्पर्धेच्या निकषात न बसणारा निकष असावा कदाचित्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा