मुंबईहून सोन्याचा पिंजरा आला होता. चौदा दिवसांची कैद! सुरुवातीला त्याचाही त्रास झाला तो असा,
"
दिवाळी नंतर गुढी पाडव्याला तुम्ही आलात खरे भेटायला. पण पहिले दोन तीन दिवस तुमच्या बरोबर फिरतांना खूप कंटाळा आला. तेव्हा "हे असं फिरायचं नसतं," असं वाटत होतं.
गाडी खूप वेगात असते. तुमची चर्चा इकडचा भात आवडला नाही अशी असते किंवा एसी लावून खिडक्या बंद करत लवकर पोहचायचं असतं.
बंद काचेच्या वेगवान गाडीतून फिरतांना, वाहतूक गतिमान झाली नसतांनाच्या काळात त्या खुल्या वातावरणात 'तत्र गन्धवती पृथिवी' हे वाक्य सुचणं, सांगणं आणि समजणं किती सोपं गेलं असेल याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी, त्याच वेळी होत असतो. अश्या काहीतरी विचारात रेंगाळत असलेलं माझं मन, रस्त्यात दिसणाऱ्या निसर्गावर खिळत असतं. भारत भरात खाललेल्या भाताच्या चवी आठवत असतं. त्यापेक्षा जराशी वेगळी चव तुम्हाला न आवडलेल्या कालच्या भाताची असते. मन, वेगवान गाडीच्या बंद होणाऱ्या काचेतून बाहेरच्या निसर्गाचा सुगंध शोधत असतं. ती काच जरा उघडी राहिलीच तर कानात भरणारा वारा कानाला भैरं करत असतो. पण, मन मात्र बाहेरच्या निसर्गाचा आवाज शोधत असतं.
मी तुमच्या बरोबर फिरतांना स्वतःलाच चुकत असतो.
"
काही दिवसात त्याचीही सवय होते. ऋषिकेश, भूज नंतर आता गुवाहाटीला तीघंही भेटायला आले होते. त्याचा परिणाम मनाला घडवणारा, खंबीर करणारा होता. अनेक महिन्यांनी आई बाबा भेटायला येणे. त्याची उत्सुकता किती? तर, बंगाल मधे असतांना आईने तिकीट काढलं. त्यानंतर जितक्या घरांमधे राहिलो, ज्यांनी ज्यांनी पुढच्या प्रवासा विषयी चौकशी केली, त्यांना, "आई-बाबा-बहीण गुवाहाटी ला भेटायला येणार आहेत" हे माहीत झालं होतं. ऋषिकेशला परिस्थिती वेगळी होती. पहिल्यांदाच आई बाबांना अनेक महिन्यांनी सामोरा जाणार होतो. त्यावेळी भावनांच्या कल्लोळाने अश्रूंचा बांध आवरता आला नव्हता. अर्थात आई-बाबांसमोर रडलो नव्हतोच! आईने पडलेला चेहरा ओळखला होता. फोटोमधे आनंदी हाव भाव दिसत नाहीत असं बाबांना नंतर जाणवलं होतं. त्यामुळे मी आनंदात नसल्याच्या ते चिंतेत होते नंतर बराच काळ, भूजला भेटायला येईस्तोवर.
भूजला मी स्वतःच्या भावना बऱ्याच प्रमाणात आवरू शकलो होतो. मनाचे सीमोल्लंघन हा लेख त्यांना भेटायच्याच दिवशी लिहील्याने, त्यांना सामोरं जाण्या विषयी दडपण होतं. पण भावना विवश वगैरे होणारे विषय त्यांनीही टाळले आणि आता महाराष्ट्रातच जायचंय या सुखद कल्पनेत रमून आनंदात त्यांना निरोप दिला.
राजस्थान मधे उन्हाने बराच रापलो होतो. माझे फोटो बघून आजोबांनी काळजी व्यक्त केली. भूजला आई बाबांनी प्रत्यक्ष खूशाली कळवली पण, आजोबांना मला भेटायचं होतं. मामीने चकल्या केल्या होत्या. तिचा फोन आला तो, सांगायलाच, "जवळपास कुठे असशील तर कळव. आजी आजोबांना घेऊन येऊ भेटायला." गुजरात मधल्या चलाला गावी पोहचलो तेव्हा आईचा आवाज बारीक झाला होता. घरी न येण्याच्या माझ्या निर्णयाने. खरं तर ते मी निघतानाच ठरवलं होतं. घोघा बंदरावर पोहचतांना सचिन दादाचे, "घरी कोणालाही नाराज करू नकोस" म्हणून सांगितलेले शब्द आठवले. आणि मग घरी आश्चर्याचा धक्का देण्याच्या कल्पनेने इतकी शक्ती मिळाली की नव्वद किलोमीटर अंतर पार करून, जेऊन, तिकीट काढून, दुपारी अडीच वाजता घोघाच्या बंदरावर विश्रांती गृहात बसलो होतो. हो, दुपारी अडीच वाजता!
तिथे रोहन पालघरला सायकलने येणार असल्याचं नक्की होतं. म्हणून त्याला ही संकल्पना सांगितली. आणि चार कानांपलिकडे पाचव्या कानी न जाण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली. घोघ्याहून आपण खंबातचे आखात ओलांडतो आणि भरूचला पोहचतो. जिथे नर्मदा समुद्राला मिळते तिथे! पुन्हा एकदा एक वेगळा आनंद आणि उत्साह! अमरकंटकी नर्मदेचा उगम पाहिला आणि आता नर्मदेचा समुद्रसंगम. एक दुःखाची छटा, मनामध्ये. नर्मदेचा प्रवास संपला म्हणून!
आता 'आवाक् होणे' म्हणजे काय? याचाही अनुभव घ्यायचा होता. सगळ्या प्रतिक्रिया यंत्रात कैद करता आल्या नाहीत.
पण 5 नोव्हेंबरला (धनत्रयोदशी) पालघरहून अर्णव, कौशल यांच्या बरोबर मी निघालो. रोहन सकाळीच डोंबिवलीहून पालघरच्या दिशेने निघाला होता. साडे अकरा वाजता विरार पथकर नाक्यापाशी आमची वाट बघत पोहचला. घोडबंदरचा रस्ता. या पूर्वी सचीन दादाला रिसीव्ह करायला गेलेलो तेव्हाच फाऊंटन हाॅटेल पर्यंत सायकल चालवली होती. त्यानंतर आता. खाडी, सह्याद्रीच्या सुरुवातीला असलेल्या छोट्या डोंगर रांगांमधला प्रवास. ठाण्याला संध्याकाळी 5.30 ला पोहचलो माझ्या मामीची, आजीची आणि सिमरनची प्रतिक्रिया छान टिपता आली. (इन्स्ता वर चित्रफित टाकली आहे.) मामी आवाक् होऊन आवाक् झाली होती.
घरी कशी प्रतिक्रिया मिळेल हे बघायचं होतं. साडेतीन ला उठून चारला ठाणे स्थानकात पोहचलो. मोबाईलमधे m-indicator नसल्याची पहिलीच वेळ. मी पंगू झालो होतो. पाच वाजेपर्यंत गाडी नाही असं समजलं. कटींग मारून वडापाव खालला. वडापाव घरी असण्याची जाणीव देऊन गेला! त्या दिवशी घरी घेऊन जाणारी ट्रेन पाहून झालेला आनंद शब्दातीत होता. दिवाळी पहाटे, अभ्यंग स्नान घरी. सयुरीला भाऊबीज म्हणून फटाके द्यायचेत असं सांगून आकाशला फटाके बाजूला काढून ठेवायला सांगितले होते. विशाल हाॅटेल पाशी पोहचून आकाशला फोन करून उठवलं. या वेळी एकही फटाका पहाटे वाजला नव्हता. "खाली फटाके घेऊन ये. फोडूयात एकत्र." घरी पोहचलो तेव्हा त्याने सयुरीला फोन करून खात्री करवून घेतली, "गंधार आलाय का?" अविश्वास! दुसरं काय😂
श्रुती काकूंना अवाक् करायचं होतं. पण त्यांची आणि माझी काही मिनीटांनी चुकामूक झाली आणि मी येऊन गेल्याचं आजींकडून त्यांना समजलं. युवोन्मेष आणि छाप्र दिवाळी अंक वृंदा मावशीकडून आणायचे होते. वृंदा मावशीने व्यक्त केलेला आनंद मी शब्दात नाही लिहीणार.
दिवाळीचे दोन दिवस आणि शिवथर घळीतून परतल्यावर चार दिवस माहेरवासी असल्या सारखे घरी लाड करून घेतले. रत्नागिरीच्या घरी बाबा आणि काका काकू होते. पण आई आणि सयुरी आसामलाच भेटणार होत्या. रत्नागिरीत आजीने औक्षण करून निरोप दिला. पुन्हा एकदा सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलो.
आता आसामला पोहचे पर्यंत परिस्थीती बरीच बदलली होती.
वर्तमानपत्र आणि विविध माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी बाबांपर्यंत माझी खुशाली पोहचवत होती. दोन-तीनदा भेटून पुन्हा दूर जाण्याला मन सरावलं होतं. ते पालकांच्या आणि पाल्यांच्या दृष्टीने ही महत्वाचं असतं. राणी काकूचं म्हणणं होतं की, "तू पहिल्यांदाच बाहेर पडतोयस ना. हाॅस्टेलला देखील कधी राहीला नाहीयेस. म्हणून जरा जास्त काळजी वाटते आहे. मला आलाप विषयी काळजी असली तरी आता सवय झालीये." एकूणच, मन खंबीर झालंय.
प्रवास सुरू करतांनाही एक विचार केला होता की, आपण "सोलो सायकलिंग" करून समाजापासून अलिप्त रहायचं नाहीये. ही लक्षणं मला सांगून चिडवलं गेलं होतं. "आता काही तू आमच्या बरोबर सायक्लवणार नाहीस." तसं होऊ न देण्याचं निश्चित केलं होतं. रावसाहेबांसारखं गर्दीत रमता यायला हवं. हा, आदर्श! अजूनही अधूनमधून "या सायकल घेऊन भेटायला" म्हणून फोनवर गुणगुण लावतो. "मी माझ्या विषयात अभ्यास करतोय. तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटा." अजून तरी कोणी सोन्याचा पिंजरा सोडलेला नाही.😂 वाचकांमधलीच काही नावांची यादी या "कोणी" मधे आहे.
अरुणाचल मधे रोईंगला पोहचलो. योगायोगाने प्रशांतसरांचा फोन आला होता. मी तिथे पोहचलोय म्हटल्यावर फेसबूक, व्हाॅट्स अॅपवर प्रवीण पायगुडेसरांचे संदेश धडकले. "प्रबोधिनीचे दहावी झालेले काही विद्यार्थी तेजू ला पोहचले आहेत. त्यांना तुला भेटायचंय." संपर्क क्रमांक मिळाले. खरं तर महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तीला भेटायची ओढ तिथून दूर असलेल्यालाच समजते. आमची फोना-फोनी झाली. त्यांनी मला भेटता येईल असे नियोजन सांगितले. एखादा दादा बरोबर असेल अश्या भ्रमात होतो. दहावीची परीक्षा झाल्यावर प्रथमेश, रोहीत, अनुज, ध्रुव हे चौघंच निघाले होते अरुणाचल फिरायला. त्यांनी मला प्रश्न विचारून झाल्यावर त्यांना प्रश्न विचारायची संधी मी सोडणार नव्हतो.
"तुम्ही कशी परवानगी मिळवलीत इथे यायला?"
"प्रवीण सर बरोबर येणार आहेत म्हणून सांगितलं होतं. ऐन वेळी त्यांचं येणं रद्द झालं."
आरक्षणाचा खर्च वाया जाण्यापेक्षा मुलांचा हट्ट बलवत्तर ठरला!
मुलांनी खऱ्या अर्थाने सोन्याचा पिंजरा सोडला होता.
अधिकाधिक सार्वजनिक वाहतूकीचा वापर करायचा आणि फिरायचं. यासारखं सुख नाही.
"जेवण कसं वाटतंय? अनुभव कसे येतायत?"
"ताटात पडेल ते चवीने खाता यायला हवं. अनुभव तर भन्नाटच येत आहेत."
ते घरी पोहचे पर्यंत आणि सगळ्यांना मिळवलेले परीक्षेतले घवघवीत यश ऐके पर्यंत संपर्कात होतो. रोईंगच्या भेटी नंतर पुन्हा भेट होईल असं वाटलं नव्हतं. पण गोल्डन पागोड्या जवळ पुन्हा भेट झाली. मी पावसात भिजून वाक्रो वरून परतत होतो.
त्यांना भेटून मलाच खूप आनंद झाला होता. याचं मुख्य कारण,
मागच्यावर्षी मी तयारीत व्यस्त असल्याने दुष्काळ निवारणासाठी जाता येणार नव्हतं. त्या पूर्वी दोन्ही वर्ष एक एक गट घेऊन गेलो होतो. मागच्या वर्षी ते जमणार नव्हतं. एका बारावी झालेल्या विद्यार्थ्याला मदत म कार्यासाठी जाण्याची खूप इच्छा होती. मी म्हटलं "अंबाजोगाईचं तिकीट काढ बाकी व्यवस्था होईल. एकट्याने जायला काही हरकत नाही." नंतर, मला त्याच्या पालकांचा फोन येऊन ओरडा बसला होता. खरं तर, हा प्रसंग मला फार वेगळ्या कारणासाठी लागला. "मुलांना पिंजऱ्यात कैद ठेऊन आपण काय साध्य करणार आहोत?"
माणूस नेमक्या कुठल्या भितीत जगत असतो?
पैश्याची भिती- लूटलं तर?
आपण स्मशानात पैसे घेऊन जाऊ शकत नाही. तिथे सगळे भाऊ बंधकीने लूटणारच असतात. प्रत्येकाचं शरीर नष्ट व्हायलाच तिथे जातं. पैसे ठेऊन किंवा देऊन करणार काय? पैश्याची रक्षा? (राखेलाही रक्षा म्हणतात.)
मरणाची भिती- जे आपल्या हातात नाही त्याची भिती का बाळगायची?
आणि असल्या थातूर मातूर भितींनी साध्य काय केलं? आपल्या पाल्याला सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करणं? हे लिहीतांना एक वर्षा आड कुठल्या तरी भंकस ठिकाणी सहलीला नेणाऱ्या शाळांनाही हाच प्रश्न नेहमी असतो. काही शाळा सोफेस्टिकेटेड होतात. आपल्याच भिंतींच्या उंची वाढवतात. फी वाढीशिवाय अजून काय साध्य करतात देवास ठाऊक!
विविध अनुभव देणे, मुलांना अनुभव देण्यासाठी मुक्त वातावरण उपलब्ध करविणे आणि अनुभव घेतांना नीतिमत्ता सुटणार नाही यासाठी चांगले संस्कार घडवणे. हा पाया पक्का झाला की पिंजऱ्याची आवश्यकता संपते.
सुदैवाने आपण भारतात जन्मलो आहोत. एक भारतीय म्हणून या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा फक्त अवकाश आहे. आज भारताला सबळ पंख असलेल्या मुक्त पाखरांची आवश्यकता आहे.
माझ्या आई बाबांनी,
"तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडूनि जा
सरिता सागरा
सोडी, सोन्याचा पिंजरा..."
हे गाणं ऐकवत, ऐकत ते जगण्यासाठीही माझ्या पंखांना बळ दिलंय.
मेल्ली, सिक्कीम.
19/5/2019
(हा ब्लाॅग एका दिवसात लिहीलेला नाही.)
अत्यंत पारदर्शी सुरेख व उत्कट भावना किती सहज सोप्या पद्धतीने मांडतोस तू गंधार...माझा सलाम तुझ्या लिखाणाला तसेच तुझ्या भावनांना
उत्तर द्याहटवा