शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

शिक्षक-पोळा




संस्थेचा शिक्षक-पोळा

शिक्षक होण्यासारखं दुसरं सुख नाही. विशेष करून, आपण ठरवून शिक्षकी पेशा स्वीकारला असेल, हतबलता म्हणून तो आपल्या नशिबी आला नसेल तर,  प्रत्येक वेळी मुलांबरोबर स्वतः घडत जाण्याचा अनुभव शिक्षकाला सगळ्या समस्यांवर मात करायला मदत करतो.

रोज काहीतरी नवीन सुचल्यामुळे आयुष्याची सृजनशीलता अखंडित राहते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशातून होणारा आनंद आयुष्याची संजीवनी ठरत असतो. दुसरीकडे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अपयशातून होणारे दुःख शिक्षकाला स्वतःच्या चुका दाखवत मार्गदर्शक म्हणून घडवत राहतं. वर्गात मुलांनी केलेल्या चेष्टा मस्करीचा आनंद घेत वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिक्षकाला स्वतःतलं बाल्य चिरतरूण ठेवता येतं. प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून वेगळा असल्याचा स्वीकार शिक्षकाला करावा लागतो. आपल्याकडून घडत असलेली भविष्यातील राष्ट्रिय संपत्ती म्हणून त्याच्याशी  वर्गात "आदर्शवादी" संवाद साधावा लागतो. तोच शिक्षकाच्या अंतःकरणाला बाहेरील विद्रूप वास्तवाची तीव्रतेने जाणीव करून देतो, मनातल्या मनातच!

चितळे मास्तर या आनंदाच्या जोरावर जगत असले तरी, त्यांना वास्तवाची जाणीव नव्हती का? की, अव्यावहारिक पणाचं झापड ह्या जडणघडणीच्या अनुभवानेच त्यांना लावलं होतं?

 

परंपरागत सुप्रतिष्ठित पांढरपेशी समजला जाणारा शिक्षकी पेशा शिक्षणातील भांडवलशाही वृत्तीने लाचार झाला आहे, पोखरून टाकला गेला आहे. शाळा शिक्षक-संचालितते कडून संस्था-संचालित झाल्यापासून शिक्षक हा संस्थेला पैसा मिळवून देणारा नंदीबैल झाला आहे. शेतकऱ्यासाठी बैल असतो तसाच! या वर्षी सोमवारी बैल पोळा आणि रविवारी- पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणजेच शिक्षण संस्थांसाठीचा "शिक्षक पोळा" आल्याने शिक्षकी पेशातल्या ह्या वास्तवावर हा दृष्टिक्षेप.-

शिक्षक वर्षभर शिकवत असतो. शिक्षणसंस्था पालकांकडून भरमसाठ फिया घेतात. पण, शिक्षकाला पगार मात्र नाममात्रच असतो. काही संस्था भरपूर पगार देतात पण शिकवण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत... म्हणजे, ठरवलेली वाक्यच बोलायची. त्यापेक्षा एकही वेगळा शब्द उच्चारायचा नाही, वगैरे! अशी बंधनं असतात शिक्षकांवर. उत्तम पगार असलेले शिक्षक, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासोपयोगी कामांव्यतिरिक्त कारकुनी कामातच अधिक जुंपले जातात. "रेकाॅर्ड्स" च्या नावाखाली असंख्य बिनडोक कामं शिक्षकावर लादली जातात. शिक्षकाच्या यांत्रीकरणाची पायाभरण बी.एड सारख्या असृजनशील अभ्यासक्रमात केली जाते. बाकी काहीच करता आलं नाही म्हणून केवळ उदरनिर्वाहासाठी शिक्षकी पेशा स्वीकारणारे शिक्षक जी.आर.च्या आधारे चालत विद्यार्थ्याचा विचार न करता असृजनशील यंत्रमानवासारखे काम करतात. त्यावरच संस्थांचे निभावते. रेकाॅर्ड्सच्या अधारे प्रमाणपत्र मिळवणं. त्यासाठी खोट्या दिखावू उपक्रमांना जन्माला घालणं. आणि "उत्तमतेचा ठसा" स्वतःवर लावून घेणं. त्या आधारे विद्यार्थी संख्या वाढवत शाळा "मोठी" करणं. अनुदानादि सरकारी सोयी अथवा सवलती मिळवणं, दिखाऊ प्रकल्पांसाठी अर्थसाहाय्य मिळवणं. आणि त्या सगळ्यासाठी लागणाऱ्या कामात शिक्षकाला जुंपणं; हा आधुनिक शिक्षण क्षेत्रावर भांडवलशाहीचा झालेला परिणाम आहे.

शिक्षण घ्यायचे नोकरीसाठी. नोकरी करायची पैसा कमवायला. पैसा कमवायचा मुलांना 'चांगलं' शिक्षण द्यायला. पैसा नसेल तर 'चांगलं' शिक्षण नाही? कर्ज काढून शिक्षण घ्यायचं. शिक्षण संपल्यावर काढलेल्या कर्जाचं आणि खर्चिलेल्या पैश्याचं भांडवल करत भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी पैश्याच्या मागे लागायचं...

त्यासाठी सगळ्यात महत्वाचं "प्रमाणपत्र". 'येन केन प्रकारेण' ते मिळवण्याचं उद्दिष्ट नसलेला शिक्षक संस्थांसाठी बिनकामाचा. कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय भारत? नॅक प्रमाणांकनासाठी एखादं विद्यापीठ किंवा महाविद्यालय महिन्या-दोन महिन्यासाठी तात्पुरत्या नियुक्त्या करतं. एखादा खोटा प्रकल्प, एखादी प्रयोगशाळा यंत्रणेसहित उभी राहते, दोन महिन्यासाठीच. भविष्यात कुठल्याही कामासाठी उपयोगी न पडणाऱ्या भंपक विषयावरच्या पी.एच.ड्या, इथून तिथून चोरून केलेल्या- बहुतांशी खोट्याच! वाटल्या जातात. त्यांच्या जोरावर शैक्षणिक संस्थेतील जागा भरल्या जातात. तीनहजाराचा कॅमेरा शाळेत नऊ हजारात खरेदी केला जातो. संस्थेचा पैसा असाच संपला की कारकुनी शिक्षकांची पगारकपात सुरू होते. जागा टिकवण्यासाठी केलेला "त्याग". याच भांडवलशाही विचाराने आजचे शैक्षणिक क्षेत्र आतून  पोखरून पोकळ केलं गेलंय. 

अत्याधुनिक यंत्रणांनी शाळा 'हायटेक' करणं काही विशेष नाही. त्यासाठी लगतो संस्थाकेंद्रित पैसा! आणि रेकाॅर्ड्सची कारकुनी रद्दी. पण शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी लागतात विद्यार्थ्यांना समजून घेणारे चितळेमास्तर. कारकुनी नाकारत संस्थेला चोख उत्तर देत वेळ पडल्यास पालकांनाही जाब विचारणारे! -संस्थांना न परवडणारे...

आपण पिढ्यान्पिढ्या बायकोच्या डोळ्यात मोती  भरतांना पाहणारे,  झिजलेल्या चपला वापरणारे चितळे मास्तरच घडवत तर नाही आहोत ना?

 

शिक्षकाला मिळणाऱ्या मानधनावर-पगारावर उपरोक्त विविध कारणांनी घासाघीस करणाऱ्या, प्रसंगी डल्ला मारणाऱ्या सरकार-संस्था आणि पालकांना आजच्या शिक्षक दिनी हाच खुला सवाल.

-गंधार.

२ टिप्पण्या:

  1. परवा लेख प्रकाशनाचे काम पूर्ण करून काल सागरगडावर गेलो. तिथे बालेकिल्ल्याच्या अवशेषांमधे सगळ्यात उंचावर महाराजांचा पुतळा आणि त्यावर छत्री असलेले शिवस्मारक आहे. त्याच्या पायऱ्यावर बराच वेळ एकटाच बसून होतो.
    सागरगडावरून एकीकडे कुलाबा, खंदेरी, कोरलाई सारखे समुद्रातले किल्ले दिसतात आणि दुसरीकडे कुंडलिका नदीचे समुद्रात पाणी ओतणारे मुख. त्याकाळी त्यांच्यावर नजर ठेवायला बांधलेला हा सागरगड! पुरंदराच्या तहात महाराजांना द्यावा लागला. मग, काही वर्षातच तो पुन्हा स्वराज्यात सामील झाला. अंग्र्यांनी टोपीवाले, इंग्रज आणि मुघलांपासून स्वराज्याचा समुद्र सुरक्षित कसा ठेवला असेल त्याची साक्ष हा सागरगड देत होता. "स्वराज्य"! खरंच काय गरज होती नाही महाराजांना हा खाटाटोप करायची? पडली असती मंदिरे, उभ्या राहिल्या असत्या मशिदी; काय फरक पडणार होता? आयाबायांच्या अब्रूंचं काय करायचं होतं त्यांना? राबणारा शेतकरी राबलाच असता आणि कुंभारानेही मडकी बनवलीच असती!
    पण तो अंधकार स्वाभिमानावर चालून आला होता. अस्तित्व नष्ट करायला. महाराजांची लढाई स्वाभिमानाच्या अस्तित्वासाठी होती. महाराष्ट्रधर्म टिकवण्यासाठी होती.
    आज, संस्थांच्या टापाखाली पिचणाऱ्या शिक्षकांचं काय? मराठी भाषेच्या अस्तित्वाचं काय?
    कुठे आहे महाराष्ट्रधर्म? कुठे आहे स्वाभिमान? कुठे आहेत महाराज?

    ढगांनी झाकलेल्या सूर्यकिरणां खाली वाहणारा वारा थोडा बोचरा झाला. हात जोडून महाराजांकडून थोडं धैर्य मागितलं. आपल्या अनुभवांतून लिहीण्यात आपण चुकलो नसू तर पुढेही लढायला...

    उत्तर द्याहटवा