इथे का? उघड्या डोळ्यांनी जग पाहिले की जनसामान्यांच्या समस्यांची जबाबदारी घेण्याची जाणीव निर्माण होते. स्वतःच्या अधिकारांवर गदा आली की जे अडकलेपण जाणवतं त्या अडकलेपणात, कोंडीत निपजतात झुरळं!
म्हातारी माणसं मोदींविरोधात ब्रही ऐकून घेत नाहीत. नव्वदीत जन्मलेल्या बहुतांशींनी पहिलं मतदान भाजपला दिलं. काॅङ्ग्रेसचं सरकार त्यांच्या मतांनी पाडलं गेलं. ज्यांचं दुसरं मतदान होतं त्यांनी मोदीलाट उंचावतांना पाहिली, काॅङ्ग्रेसला संपवणं हा त्यांच्या तरुण रक्तावर झालेला संस्कार होता. चाळीशीतले तरुण म्हणाल तर त्यांनी भारताची बाजारपेठ खुली होऊन घडलेली संगणकीय क्रांती नुसती अनुभवलीच नाही, तर त्या जोरावर एक उंची गाठलेला रोजगार, आर्थिक-भौगोलिक स्थिरताही अनुभवली 2018 पर्यंत. सगळेच बदल निंदनीय नसतात. बदल नित्य असतो. धोरणात्मक बदल स्पष्ट दूरदृष्टीने व्हायला हवेत ही अपेक्षा चुकीची असू शकत नाही. 2018 पर्यंत केलेल्या बदलांसाठी जी कारणमीमांसा दुरदृष्टी म्हणून सांगितली गेली ती जनतेने स्वीकारली म्हणून पुढचं सरकार आलं.
आजच्या तीशी-चाळीशीतल्या पिढीने 2019 नंतर अनुभवली केवळ अस्थिरता, मनाविरुद्ध (स्थानिक स्थिरतेला छेद देणारा) लादलेला विकास. कारण-मीमांसा ही दूरदृष्टी नसते हे तरुणांना समजलं. स्वतःच्या कराची उधळपट्टी, नागरिकांची जबाबदारी न उचलणारे प्रशासन, शैक्षणिक आणि आर्थिक अधोगती आणि राजकारण्यांचा नंगानाच! मोदीविरुद्ध बोलणाऱ्या ह्या तीशी चाळीशीतील तरुणांसमोर काॅङ्ग्रेसच्या भूतकाळातील वाईट कामांचा पाढा वाचून दाखवणाऱ्या म्हाताऱ्यांनी कधीतरी याच तरुणांशी त्यांच्या भविष्याविषयी, देशासाठी स्वतः निभावत असलेल्या जबाबदाऱ्यां विषयी, आणि कुठच्याही पक्षाच्या सत्ताधारींकडून असलेल्या अपेक्षांविषयी, संवाद साधायचे सौजन्य दाखवायला हवे.
नोकरशाहीच्या एककेंद्रीकरणाने होणाऱ्या दुष्परिणामांतून सध्या भारत जातो आहे. ह्या एककेंद्रीकरणाला मिळणारे संघाचे आंधळे समर्थन केवळ बुद्धिभेद निर्माण करणारे आहे. हिंदूराष्ट्राचे भविष्य काय? हिंदुराष्ट्राचे जीवनमान कसे असेल? त्यासाठी आजपासून शैक्षणिक क्षेत्रापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत काय धोरणं असायला हवीत याची दूरदृष्टी भाजपच्या थिंक बँक मानल्या जाणाऱ्या संघाकडे आहे का? याचं उत्तर नाही! हेच येतं. तसं धोरणांतून सातत्याने भाजपने दाखवूनही दिलेलं आहे. ज्यावर संघाने सोयीस्करपणे मौन बाळगले. संघ आणि भाजप भारताला भरकटवत आहेत आणि हिंदूंना गर्ततेत लोटत आहेत. 'श्रुतं चैव यत् कण्टकाकीर्ण मार्गम्' ही प्रार्थनेतली ओळ म्हणतांना, मार्गावरील ते काटे स्वतः झेलून साफ करत माझ्या मागच्यांसाठी मार्ग सोपा करणं हे हिंदूंचं कर्तव्य असावं की, आम्ही काट्यावर चालून इथवर पोहचलो म्हणून तुम्हीही काट्यावर चालणेच तुमचे कर्तव्य आहे ह्या विचारांना प्रोत्साहन देणं?
सरकारी धोरणांमुळे, दिल्लीतली नोकरशाही अनुभवल्यामुळे मी एक करदाता म्हणून निराश झालेलो आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत अनुभवाला येणाऱ्या भाजपला आजच्या घडीले समर्थन देणे अवघड आहे. विकेंद्रीकरण म्हणजे गल्ली पासून राज्यापर्यंत सत्ता स्थानिकच हवी दिल्लीचे लांगूलचालन करणारी नव्हे!
असो, संस्कृतचा अभ्यासक म्हणून उजव्या विचारसरणीत वावरणे भाग असते. त्यांच्या विरोधात गेल्याने मी डावा होत नाही आणि त्यांच्यात वावरल्याने उजवा तर मूळीच नाही! महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक अभ्यासकांना भगवान बुद्ध का भावले असतील ते अश्यावेळी समजतं. काम करत राहायचं, भाषेतून अभिव्यक्त होत राहायचं.
अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम्
विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः॥
गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा