Today's ride 83kms.
Siliguri to Dhupguri
Saur 2 Chaitra 1941
माझ्या सायकलने कुत्र्याला उडवलं. नंतर सायकल पडली. तिच्या बरोबर मीही पडलो.
#श्वानाप्रिय मी भाग -3
तर झालं असं, की माझ्या समोरचा रस्ता सुस्साट रिकामा होता. नुकतच रेल्वे फाटक उघडलं होतं. माझ्या मागे अश्वशक्तिधारी गाड्यांची स्पर्धा सुरू होण्या पूर्वी मी वरदळीचा पट्टा ओलांडण्याच्या प्रयत्नात तीसचा वेग बसल्या बसल्याच गाठला होता. उजव्या बाजूला मासळीबाजार होता. लोकं कुतूहलाने वेगवान #bergamontbicycles कडे बघत होते. ती ऐटीतच रस्ता कापत होती.
तेवढ्यात एका तांबड्या कुत्र्याने डावीकडून धावत येत माझ्या समोर रस्ता ओलांडला. रस्त्याच्या कडेला एक काळं कुत्र कान टवकारून बघतंय दिसल्या बरोबर पाय मारणं थांबवलं. पंचवीस पर्यंत वेग उतरला असेल. आता अजून वेग घेतला तर कुत्र्याला माझ्या मागून जावं लागेल. म्हणून जोर लावून अठ्ठावीस पर्यंत पोहचलो. तोच माझ्या समोरून तो रस्ता ओलांडायला वाकडा धावला. त्याला "विश्चकद्रा" म्हणतात (वेडीविकडी पावलं टाकणारा) असं निरुक्तात वाचलं होतं ते अनुभवायचं होतं.
मी कच्चकन थांबक दाबला बावीस पर्यंत उतरलो. त्याच्या पुढे अजून थांबक खेचणं म्हणजे डिस्क तोडणे किंवा चाक आऊट जाण्याचे संकट स्वतःवर ओढावण्यासारखं होतं. मी थांबक सोडून देत वेगाला बावीस वरून शून्यापर्यंत आणण्याचं काम कुत्र्यावर सोडलं.
हे काळं कुत्र मांजरीपेक्षा चपळ निघालं. छान आवाज करून निघून गेलं धावत पुढे.
शीरस्त्राण होतं. डोक्याला काही लागलं नाही. कुत्र्याने सायकल छान थांबवली होती. कुठ्ठेही खरचटलं नाही. डावा तळहात रस्त्यावर ठेवला गेला. इतकं वजन त्यावर एकदम पडलं म्हणून तेव्हाच दुखलं. ते बरं झालं. दुखणं लगेच समजलं की अजिबात लागलेलं नसतं.
मी सायकल उचलली. न अडखळत उभा राहिलो. माझा छोटा मोबाईल खिश्यातून निखळून रस्त्यावर पडला होता. मला समजायच्या आत एका सज्जनाने माझं लक्ष वेधून मला आणून दिला. समोर मासळी बाजारतून काही जणं मला बोलवत होती. पायाला मुकामार वगैरे लागला नसल्याने, न लंगडत रस्ता ओलांडला. लोकांनी माझ्यासाठी जागा केली होतीच.
बसायला दिलं. शीरस्त्राण काढायला लावलं. कुठेही लागलं नाहीये बघून हातावर ठेवायला बर्फ दिला.
कोण? कुठला? वगैरे बंगालीत गप्पा झाल्या. मग त्यांना समजलं मी बंगाली नाहीये. "आमची बांगला वेगळी आहे."
"कशी बरं? काय नाव?"
"कामतापुरी बांगला"
त्यांनी मला कुठून आलास? म्हणून त्यांच्या त्या कामतापुरीत प्रश्न विचारला. फारसा काही फरक नाही जाणवला.
जसं सोलापूरातला अमराठी माणूस मुंबईतली मराठी पण समजू शकतो, तसंच. मराठी माणसालाच मराठीतला फरक कळेल. तसं काहीसं माझं आणि त्यांच झालं असावं.
मयनागुड़ी मासळी बाजारातली ही गोष्ट.
मला माझे श्वानाप्रियत्व वाढवायला एक कारण मिळालं होतं.
सरळ साध्या रस्त्यावर तीसचा वेग वगैरे पकडायला जोश कुठून आला होता? तर, निसर्गाने दिला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरी-गुलाबी रानफुलं होती. त्या पलिकडे चहाचे मळे होते अथांग पसरलेले. काही ठिकाणी भातशेती होती तर काही ठिकाणी गवताचे गालीचे... त्यात मधे गुलाबी रानफुलं. ईशान्येकडे जाणाऱ्या भारताचा अगदी अरूंद पट्टा ओलांडत होतो. दक्षिणेकडे बांगलादेश, उत्तरेकडे भूतान आणि मधे भारतात मी. फक्त स्वप्नात रंगवलेल्या, गप्पांत रंगलेल्या, पुस्तकात आणि वृत्तपत्रात वाचलेल्या ईशान्यभारताकडे मी जात होतो, जात आहे. डोंबिवलीत सूर्य पोहचेल तेव्हा मी त्याला तासाभरापूर्वी किंवा त्याहीपेक्षा आधी बघितला असेल. कधीही पाऊस पडेल. यंदा उन्हाळा जून महिन्यात बिहार-उत्तरप्रदेशात अनुभवीन. बाकी सगळा वेळ पाऊस आणि थंडी. आणि आताही, डोंबिवलीत सगळे पंख्या खाली घाम गाळत असतील कदाचित. मी मात्र हिमालयावरून येणारा गार वारा अनुभवतोय. मेघ दूत म्हणून रामटेकला आला असेलही माझ्या बरोबर हिमालयातही आला. मी त्याच्या घरी जातोय... मेघालयात...
आणि नद्या? त्यांना कसा विसरू? भारतातल्या फार कमी नद्या बघायच्या राहिल्या आहेत. सिलीगुडीत महानंदा ओलांडली, जलपायगुडीत तीस्ता, मग जलढाका. काचेसारखं पारदर्शक पाणी! खोल खोल तळ दाखवणारं. इतक्या नद्या बघितल्या आता एक नद बघायचाय, ओलांडायचाय, ब्रह्मपुत्र...😍😇
या निसर्गसंपन्न भारताचा मी एक नागरिक, विविधतेने नटलेल्या परंपरा अनुभवतोय. कंटाळा, म्लानता सुचणार तरी कशी आणि कुठून?
धूपगुड़ी, प.बंगाल
Good and enjoyable posting. Glad to know you did not hurt yourself. Take care of speed
उत्तर द्याहटवाEnjoy your rides and mission for promotion of mother tongue
very nice to read....take care while driving....i think appropriate breaks in between will help you rejuvenate energy
उत्तर द्याहटवामस्त गंधार
उत्तर द्याहटवातू वर्णन केलेले निसर्गचित्र डोळ्यासमोर उभं राहिल.
खूप छान लिहितोस नेहमीच
Break साठीचा मराठी शब्द ही समजला आज तुझ्यामुळे.
रस्त्यावरून फिरणार कुत्रे हे बऱ्याचता स्वत:ला तरी संकटात टाकतात पण वाहन चालकालाही. बरं काही लागले नाही, तुझा संयम व आत्मविश्वास अन्यथा काही जणांची घाबरगुंडी उडते. पुढील वाटचालीस शुभेच्छा व सुखरुप रहा. दीमापुरला जाणार का, तिथे चीन सारखे किडा मार्केट आहे, तेथे पाल, साप , इतर किडे मासळीबाजार बाजारासारखे विकायला असतात. मला पहाता आले नाही
उत्तर द्याहटवा