रविवार, २४ मार्च, २०१९

तेल, कर्क

Saur 3 Chaitra 1941
Today's ride 63.63kms
Dhupguri-Coochbehar

भारतभरात विविध तेलांचा वापर करत रोजचं जेवण बनतं. जिथे जे पिकतं त्याचं तेल! शेंगदाणे, खोबरे, तीळ, मोहरी हे तेलाचे पारंपारिक प्रकार. मानसोल्लास नावाच्या संस्कृत ग्रंथात अकराव्या शतकात, जेवण बनवतांना, वांगे भाजून त्याला सुटलेलं तेल काढलं जात आणि ते वापरून जेवण केलं जाण्याचं वर्णन आहे. सूर्यफूल, तांदूळ, ऑलिव्ह वगैरे हल्लीची तेलं.
प्रत्येकाच्या घरात आई-मावशी-आत्या-काकू-मामी-आजी-ताई सगळ्या बाई माणसांचं स्वतःच्या घरात वापरलं जाणाऱ्या तेलावर विशेष प्रेम असतं. घरच्या जेवणाला त्या तेलामुळेच चव येते अशी धारणा घरा-घरात रुजलेली दिसते. हाॅटेल मॅनेजमेंट करून आलेला उत्तम स्वयंपाकी देखील वापरल्या जाणाऱ्या तेलाविषयी काटेकोरपणा पाळतो.
घरातून बाहेर पडणाऱ्या मुलाला साधारणपणे संपूर्ण समाजाचे, खासकरून घरातून बाहेर न पडलेल्या पुरुषव्यक्तीचे आणि  समस्त स्त्रीबांधवांचे जे सर्वसामान्य प्रश्न असतात त्यातला एक म्हणजे तेल, त्याची चव आणि खाणं!
पण खरं सांगू का,
त्या त्या प्रांतातील, ते ते जेवण त्या त्या तेलात इतकं चविष्ट लागतं की, तुम्ही जर माझ्या सारखे अस्सल खवय्ये असाल तर सरसों का तेल असो की खोबरेल् तेल असो त्यात तयार झालेल्या लिट्टी पासून मासळी पर्यंत, त्यात तळलेल्या फणसाच्या गऱ्यापासून  मालपुव्या पर्यंत सगळे पदार्थ खूप चविष्ट लागतात.
मी घरच्या जेवणाची आठवण येण्यासाठी स्वतःकडे कारण ठेवत नाही. अनेक घरांमधील जेवण खाललं आहे. ते घरचंच जेवण होतं असं म्हणतो.
विविध चवींनी आणि तेलांनी नटलेल्या खाद्यपरंपरांचा मला अभिमान आहे!
मला कोणी आतिथ्य देण्यासाठी मराठमोळं जेवण करायचा प्रयत्न केला की अजिबात आवडत नाही. कारण ती 'ना घर का, ना घाट का' चव बनलेली असते!
"चार दिनों की बात है,
रोज़ नया खाना खाना है
पेट भरके जीना है"
ईशान्य भारत फिरून झाला की राष्ट्रीय भाजी कोणती? यावर लिहीणार आहे...
सदर तैलसंस्कृती विषयी लिहीण्याचं कारण, योगायोग!
कोणीतरी मला "सरसों का तेल आवडतं का?" विचारलं. फार सरळ उत्तर न देता, "सायकलवर सूर्यफूलाच्या तेलाचा डबा घेऊन फिरता आलं असतं तर नाही म्हणण्यावर विचार केला असता." असा सूर्यफूलाचा उल्लेख केला आणि अहो आश्चर्य! आजच्या प्रवासात दोनहून जास्त सूर्यफूलाची शेतं दिसली. अनेक महिन्यांनी सूर्यफूल बघितलं.
प्रवासाचा काही वेळ या योगायोगावर विचार करण्यात गेला.

सायक्लवतांना अनेक विचार  डोक्यात घोळत असतात, रेंगाळत असतात. #सायकलोपासना #भाषारत असल्याने भाषे विषयी प्रामुख्याने असतात.
आदल्या दिवशी लिलेल्या लेखांमधील शब्दांवर उगाच विचार होत होता.
"मकरवृत्त= tropic of Capricorn
कर्कवृत्त= tropic of Cancer
विषुवृत्त= equator?"

प्रश्न वाचकांना सोडवता आला तर वाचायला आवडेल. मी, "कर्क" या एकाच शब्दावर विचार करत होतो.

मला हा ध्वनिवाचक वाटतो. खेकडा कटर् कटर् आवाज करतो.  "कर् कर् इति ध्वनिं करोति स कर्कः"
आकृतिबंधाने कर्कत्व विविध गोष्टींवर पसरलंय. रास-वृत्त (खगोल), रोग, कर्कटक, वगैरे शब्द रोजच्या व्यवहारातले.

"कर्कटक" हा शब्द लहानपणी सहज कानावर पडायचा, हळू हळू मौन झालाय. दुकानात गेल्यावर जुना गुजराती दुकानदारही कर्कटक काढून देईल. पण नवीन दुकानदार पेचात पडेल "नवीन" शब्द ऐकून आणि लहान मुलालाच, "याला कंपास म्हणतात," म्हणून शिकवेल.
पुढल्या वेळी दुकानात जाताना तो लहान मुलगा का म्हणून कर्कटक शब्द वापरेल?
"आडवं झालं कर्कटक तिरडवर इंग्रजीने बांधलेल्या..."
बोली मरते म्हणजे काय होतं?
शब्द संचय, वाक्य रचनेतील वैविध्य अटत जातं, नाविन्य मरतं. भाषेचे भाषिकच बोलीला मारत असतात आणि स्वतःहूनच तिला तिरडीवर बसवत असतात. भाषा मरू शकत नाही. ती नित्य आहे. एका बोलीचा भार दुसरी बोली स्वीकारते. कर्कटक शब्दाचा भार कंपास शब्दाने उचलला. वस्तू तिथेच राहिली. माणसाला वस्तूचं हवं असणंही तिथेच राहीलं. प्रकट होताना केवळ शब्द बदलला.
फार जास्त तांत्रिक झालं, माफ करा.
पण या प्रक्रियेसाठी समाजही तितकाच कारणीभूत असतो. आठवी पासून कर्कटक वापरायला सुरूवात होते. आणि आठवी पासून सगळ्याच शाळा सेमी इंग्रजी झाल्या की कर्कटक शब्दाचे मरण उद्भवते...
#bergamontindia #bergamontbicycles #21dayschallenge #dombivlicycleclub #bikeport #Pitambari #cyclopasana

४ टिप्पण्या:

  1. गंधार खूप छान लिहिले आहेस. तेला पासून सुरू झालेला प्रवास कर्कटक पर्यंत कसा गेला ते कळलेच नाही.असो असेच लिखाण कर आणि तुझ्या सोबत आम्हाला तुझ्या प्रवासात घेऊन जा. आशीर्वाद

    उत्तर द्याहटवा
  2. लेख छानच
    "मी घरच्या जेवणाची आठवण येण्यासाठी स्वतःकडे कारण ठेवत नाही." हे फारच आवडलं.खरा खवैय्या.

    तिरडीवर गेलेल्या (नेलेल्या) शब्दांना पुनर्जीवित करायला हवे त्यांचा वापर आवर्जून करायला हवा हे पटल अगदीच.

    उत्तर द्याहटवा
  3. लेख छानच
    "मी घरच्या जेवणाची आठवण येण्यासाठी स्वतःकडे कारण ठेवत नाही." हे खूपच आवडलं. खरा खवैया.

    तिरडीवर गेलेल्या(नेलेल्या) शब्दांना पुनर्जीवीत करायला हवं, त्यासाठी आवर्जून त्या शब्दांचा वापर करायला हवा गे अगदीच पटल.

    उत्तर द्याहटवा