सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

कासोद्याची दिवाळी

शाळेत असतांना अगदी सातवी-आठवी पर्यंतच्या सगळ्या दिवाळ्या मला अजूनही आदर्श, अविस्मरणीय वाटतात. कासोद्याला सगळे चुलते एकत्र येऊन दिवाळी साजरा केली जात असे. केसोदा हे जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातलं एक खेडेगाव. चार-पाच दिवस तरी तिथेच मुक्काम! सगळ्या ताया, दादा, लहान भाऊ, समवयस्क बहिणी, काका, काकू, आजी; एक वेगळाच अनोखा सोहळा.

एखादे दिवशी सकाळी झणझणीत मिसळीचा नाश्ता झाला की अंगणात चूल पेटवली जात असे. दूध आटवून काका बासूंदी करी. मग शेवेच्या भाजीची साग्रहसंगीत पंगत.
तर कधी, शेतात जाऊन नदीत अंघोळ, शेतातच केलेलं वांग्याचे भरीत आणि शेतातच झालेलं एखाद्या दिवसाचं जेवण. मग बैल गाडीला जुंपले जात आणि फरकांड्यापासून कासोद्याच्या घरा पर्यंत बैलगाडीतून 4-5 किलोमीटरचा प्रवास! त्यात झूलत्या मनोऱ्याची गोष्ट सहज कानावर पडायची. या ऋतूत हवेत शांत गारवा रेंगाळत असे. शेतात पीक उभं राहिल्यावर किडे, चिल्टं का कमी येणार खेडेगावात? त्यांना आम्ही खूप भ्यायचो. मग रात्री दिवे लागण झाली की मागच्या खोली बाहेर असलेल्या संडासात जातांना राम जप करायला गत्यंतर नसे. घरात कमी पाखरं यावी म्हणून संध्याकाळी धूरी करण्यासाठी चालत्या बैलगाडीत उभं राहून कडूलिंबाच्या काटक्या, पानं तोडायचं काम दादा करायचा. त्याचं बघून आम्हीही आरडा ओरडा करत तोल सावरत उभे राहण्याचा निष्फळ प्रयत्न करायचो. मग गाडी हाकण्यासाठी पुढे कोण बसेल यावरून भांडणं व्हायची. पुढे बसल्यावर शेपटी बरोबर शेण वगैरे उडालं की 'बिट्टी', चिडवा चिडवी व्हायची.
आम्हा मुलांचा दिवसभर दंगा! कधी कधी घरा समोरील चिंचेच्या झाडावर वानरं यायची. त्यांच्या बरोबर आमच्याही माकडचेष्टा चालायच्या. भूलाबाईची गाणी वगैरे डोंबिवलीत कधीही कानावर न पडणारे असंख्य शब्द तिथे परंपरा म्हणून कानावर पडायचे. आमची खेचण्यासाठी काका मुद्दाम काहीतरी अहिरणीतून बोलायचा आणि आम्हाला गोंधळवायचा.

एके वर्षी आम्हाला सुट्टी लागल्या नंतर आम्ही कासोद्याला गेलो. तेव्हा तिथल्या शाळांना सुट्टी लागली नव्हती. लहान भाऊ, तिसरी-चौथीत असेल. शाळा चालू असतांना त्याला आम्ही आलो आहोत म्हणून बोलवून आणले. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला सोडून दिले. तेव्हा माझ्या शाळेचा मला खूप राग आला होता.

पहिल्या अंघोळी साठी स्वयंपाकघरात पाट मांडले जात. उटणे लावण्यासाठी सगळ्यांचीच किरकीर असे. सुगंधापेक्षा खडबडीत पणा त्रासदायक वाटायचा म्हणून! मग तांब्याच्या बंबात तापवलेलं पाणी मिळायचं. (आज हे लिहीतांना खूप हेवा वाटतोय.) मागच्या खोली बाहेर नाहणीघराहून मोठी मोरी होती. तिथे सकाळी हवेतील गारठ्यात कुडकूडत अंघोळी व्हायच्या. एकाची अंघोळ चालू असतांना दुसरा फूलबाजी ओवाळायचा. आई आणि काकूंकडून कणिकेच्या दिव्यातून ओवाळले जायचेच. आजी दादाला सांगायची, "अंघोळी चालू आहेत. एखादी माळ लाव." नवीन कपडे घालून सगळ्या खोल्यांमधे विखूरलेल्या मोठ्या मंडळींना शोधत आशिर्वाद घेण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर  एकत्र फराळ व्हायचा. मग राम मंदीरात जायचे. तिथे गप्पा मारत आणि घरा भोवतालच्या परिसरात हुंडरत, कोणी तरी शोधत येई पर्यंत दुपार झाल्याचे समजत नसे.

एस.टी. स्टॅण्डवर काकाचे बियाणे आणि खत विक्रीचे दुकान होते. त्यामुळे लक्ष्मीपूजन दणक्यात साजरे होई. झेंडूच्या फुलांच्या माळांनी बाहेरच्या खोलीतील भिंत सजवली जाई. भिंतीवर चंद्र-सूर्य, लक्ष्मीचे चित्र वगैरे लाल रंगाने काढलेले असे. चौरंगावरील ताम्हणात गव्हा-तांदूळाच्या लक्ष्मीला अलंकारांनी मणवण्याचे काम काकू आणि आई करत. हिशोबाची पुस्तके (चोपड्या) यांच्या आराशीच्या बाजूला दोन समया लावल्या जात. ज्वारीच्या लाह्या आणि बत्ताश्याचा मूठभर नैवेद्य वाटला जाई. गावात असलेला एकमेव भटजी ठरलेली घरं करून पूजा सांगायला येत असे. तो अर्ध्या तासाचा चुळबूळ करत 'शांत बस'ण्याचा कार्यक्रम आटोपायची आम्हाला घाई असे. कारण त्यानंतर फटाक्यांचे समान भाग करून प्रत्येकाला आपापले वाटे दिले जात! नाग गोळीच्या धूरामुळे घरातली पाखरं बाहेर जातील म्हणून ती अगदी वऱ्हांड्या जवळ लावायचा नेम होता.
भाऊबीजेला बहिणी भावाला तेल-उटणं लावायच्या. संध्याकाळी तर ओवाळणीच्या वेळी सगळ्यांना सारख्या पण आपापल्या आवडत्या रंगाच्या वस्तू मिळण्यासाठी चुरस असायची. आवडती बहीण, आवडता काका, आवडती आत्या, आवडती काकू वगैरे वगैरे अगदी निरागस चर्चा भातुकलीच्या खेळात रंगायच्या!त्यानुसार रंगही ठरायचे...
कधी, एखादी फेरी एरेंडोलला घडली की पद्मालयच्या मंदीरात  तिथल्या तलावात कमळांच्या देठात पाय अडकून गेलेल्या कोणाच्या तरी गोष्टीने आणि भीमकुंडावर पडलेल्या भाताच्या 'महाभारतातल्या' असंख्यवेळा ऐकलेल्या आख्यायिकेने दौरा घडायचा.

हा सगळा दिवाळीचा सण शिगेला पोहचला असतांना एके संध्याकाळी निघायची वेळ यायची आणि कधी डोळे पाणावत, तर कधी हट्ट धरून निरोपा निरोपी व्हायची.
काही कारणांनी कासोद्याला चार दिवस जाणे बंद झाले. अकरावीत असतांना काका गेला. कासोद्याच्या घराचे दार कायमचेच बंद झाले. आता त्या एकत्र साजरा झालेल्या दिवाळीच्या आठवणी मात्र दर वर्षी उजळल्या जातात. कासोद्याच्या घराने, फरकांड्याच्या शेताने मनात एक छोटसं घर करून ठेवलं आहे.

दिवाळी 2017

२ टिप्पण्या:

  1. गंधार
    तुझ्या वयाच्या मुलाला अशी दिवाळी लहानपणी मिळाली, खरच भाग्यवान आहेस.
    तुझ्याच वयाच्या असलेल्या शहरात वाढलेल्या मुलांना हे सगळं कल्पनेतही चितारता येणार नाही

    बंब हा प्रकार आताच्या मुलांना माहीतही नसेल कदाचित कुणाला.

    तुझ्या लहानपणीची दिवाळी खूपच छान

    उत्तर द्याहटवा