सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

आरित

'सायकल' आणि माझे जीवाभावाचे संबंध! बारावीत लपून सायकलिंग ला जाण्यापासून नंतर उज्जैन-डोंबिवली सायकलस्वारी पर्यंत आणि पुढे आता पर्यंतचा प्रवास, यामुळे 'सायकल' माझे अर्धाङ्गच बनली आहे. भेषेचा एक विद्यार्थी म्हणून तिच्याशी संबंधित अनेक शब्दांचा ऊहापोह डोक्यात चालूच असतो. एलिझाबेथ एकादशी बघून माझ्याही सायकलचे नाव औरंगाझेबी ठेवावे असा विचार मनात आला होता. 
गंमतीचा भाग वगळता... दुचाकी हा सामान्यपणे कुठल्याही दोन चाकी वाहनाला वापरला जाऊ शकणारा शब्द. त्यात फक्त 'सायकल' ला दुचाकी कसे म्हणता येईल? 'bicycle' हा रूढार्थाने भारतीय इंग्रजीत वापरला गेलेला शब्द. पण अमेरिकेत अगर पाश्चात्य देशात 'bike' हाच शब्द रूढार्थाने सायकलसाठी वापरला जातो. किंबहुना professional cyclists बरोबर बोलताना 'सायकल' या शब्दाचे उच्चारण cheap वाटते. त्यामुळे ज्याप्रकारे इंग्रजीत 'bike' मुळे motorbike की bicycle असा संभ्रम निर्माण होतो त्याच प्रकारे 'दुचाकी' मुळे झाला तर त्यात काही विशेष नाही. सायकल हा अकारांती, स्त्रिलिंगी शब्द मराठीने स्वीकारून त्यावर मराठी प्रत्ययादी संस्कार करून स्वतःला समृद्ध करणे सर्वार्थी व्यवहार्य ठरेल.


दुचाकी puncture होणे. याला मराठीत काय म्हणतात? to puncture हे क्रियापद बघितले तर त्याचा अर्थ छिद्र पडणे व त्यामुळे आतील द्रव्य बाहेर ओसंडून पडणे (ooze होणे) ह्या दोन क्रमिक क्रिया येतात. मग अश्या अर्थी शब्द अस्तित्वात आहे का? नसेल तर कसा बनवता येईल? असे विचार डोक्यात होतेच.
पावसाळ्याचे दिवस होते. डोंबिवली-पुण्याचा निसर्ग-रम्य प्रवास करून वर्गात बसलो होतो. वेदाचा तास होता. 'पूषन्' देवतेचे वर्णन सुरु होते. तोच त्या वैदिक संस्कृतात, मी गावाला असतांना ऐकलेला आणि आजी बरेचदा वापरते असा 'गाउण्ढळ' शब्द त्याच अर्थी आल्याचे पाहून जागा झालो. पूषा देवतेची शस्त्रे, "आरा", "अष्ट्रा". त्या देवतेचे काम, चरायला गेलेल्या गुरा ढोरांना घरी आणणे. "बैलाला कसं आर्याने सारखं टोचाव लागतं, तसं तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत सारख टोचत राहिलं पाहिजे.", आजीचं नेहमीच वाक्य हे! हा आरा म्हणजे काय, एका लांब काठीला पुढच्या बाजूला खिळ्याच टोक बाहेर असलेले एक शस्त्र. तो खिळा बैलाला टोचला, पाठीत घुसवला, की बैल धावतो, त्याच्या पाठीतून रक्तही येत बरेचदा. बैलगाडीत 
बसल्यावर हा प्रकार अनुभवला होता. म्हणजे कुठलेही टोकधार शस्त्र ज्याचा वापर टोचायला केला जातो त्याला 'आरा' हा वैदिक शब्द आहे. आणि अजूनही तोच शब्द जळगाव जवळच्या ग्रामीण मराठीत, कदाचित अहिरणी बोलीत वापरला जातो. वा वा! छानच interesting! 

सायकल puncture होते म्हणजे नेमकं होता काय? टोकधार वस्तू वायूनलिकावरणात (tyreमध्ये) घुसते आणि वायूनलिकेला (tubeला) छिद्र पाडते, ज्यामुळे हवा बाहेर येते! मिळाला की मग शब्द… 
"आरित", टोकेरी शस्त्र ते 'आरा' त्यामुळे जी क्रिया घडते ते 'आरणे' आणि घडलेल्या क्रियेमुळे जो परिणाम दिसून येतो ते "आरित"
आज राज्य मराठी भाषा दिन. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. Puncture होणे या इंग्रजी शब्दासाठी बोलायला सोपा आणि अर्थयुक्त शब्द समर्पित करीत आहे. दुचाकी आरित झाली. cycle आरित झाली. येथे आरित काढून मिळेल. आरित काढायला जातोय. आरितामुळे उशीर झाला. 
भाषा क्लिष्ट वाटू लागते जेव्हा त्यात artificial पणा येतो. ज्या प्रमाणे 'महापौर' हा शब्द आग्रहाने वापरात आला आणि माराठीतेने तो स्वीकारला तसाच 'आरित' हा ही स्वीकारला जाईल ही विनम्र अपेक्षा करतो. मराठी भाषा अधिकाधिक 
समृद्ध व्हावी यासाठी शुभेच्छा! मराठी राजभाषा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!


३ टिप्पण्या:

  1. छान शब्दांकन केलयस. महत्वपुर्ण माहीती मिळाली .... धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त, एक छान नविन शब्द. सायकलीच्या चाकांना ज्या तारा आसतात त्यांना आरा म्हणतात मग सायकलला आरेधारी म्हणू शकू का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. स्पोक्स या अर्थी जो "आरे"असा शब्द वापरला जातो, तो "आरा"या शब्दापासून बराच वेगळा आहे. टोकधार टोचले जाऊ शकते एवढ्याच अर्थी फारसे साम्य असेल. सायकलच्या त्या एका भागावरून तिला नावच आरेधारी पडणं योग्य वाटत नाही. किंबहूना ते एक विशेषण म्हणून शोभेल.
      भाषेमध्ये, विशेषतः मराठी सारख्या- जिचे आजच्या पिढीसाठीचे अस्तित्व हे "भावना पोहोचण्या" पुरते मर्यादित आहे- तिच्यात एखादे विशेषण विशेषनाम स्वरूपात रुजवणे कठीण आहे.

      हटवा