गुरुवार, १५ मार्च, २०१८

प्रयोग

पुण्याहून फोन आला. "तुझ्या नावाशिवाय चालू असलेली एका 'त्या' विद्यार्थ्या विषयीची चर्चा ऐकली. मानसोल्लास शिकवतांना बाईंनी तू करून आणलेल्या मुद्गसूपाविषयी,  तुझं नाव घेऊन, दूरवरून येणाऱ्या एका विद्यार्थ्याचा प्रयोग सांगितला गेला. त्या चर्चेतला 'त्याच्या' बरोबरच मी शिकलो आहे."
मनोमन आनंद झाला. मार्कांमध्ये न तोलता येणारी ही पोचपावती होती.😇

प्रयोग!
मी जोवर प्रयोगशील आहे, तोवर जीवंत आहे. माझ्यातली प्रयोगशीलता जेव्हा संपेल तेव्हा मी मेलेलो असीन. प्रबोधिनीचा एक विचार स्वतःत भिनवायचा प्रयत्न करतोय. "रोज काहीतरी नवीन सुचलेच पाहीजे; कालच्या पेक्षा आज पुढे गेलेच पाहीजे." सायकलोपासना करतांना नाविन्याला अभिव्यक्त होता न आल्याने येणारी उदासीनता दिवस वाया गेल्याची जाणीव करून देते. अस्वस्थ करते.

पुण्यात शिकत असतानाची गोष्ट. सदाशिव पेठेत फिरतांना संस्कृत अभ्यासकांविषयी एक कडवी टीका ऐकली. "वर्षोंवर्ष लोकांसाठी निरुपयोगी असलेले प्रकल्प करणारे बघायचे असतील तर संस्कृत क्षेत्राकडे बघा!" त्या क्षणी प्रचंड रागही आला. पण, नंतर विचार केला. खरंच तर आहे! काही दोनशे वर्ष आणि काही तर असंख्य वर्ष न संपणारे प्रकल्प सध्या पुण्यातल्या विविध संस्थांमध्ये चालू आहेत. एखादा खंड प्रकाशित होतो. शास्त्रज्ञ काळ्यापुठ्ठ्यातली पानं वाढवतात. पदव्यांचे कागद घरी फ्रेम वगैरे करून लावले जातात. पण, त्यांची लोकोपयोगिता काय? असा विषय मानधन मिळणारे अभ्यासक टाळतात तरी किंवा दुर्लक्षित तरी करतात. मीही तसं  करून टीकेचं धनी न होण्याचा निश्चय झाला. आणि चालू असलेल्या अभ्यासात काय प्रयोग करता येतील यावर विचार चक्र सुरू झाले. अकराव्या शतकातील राजाच्या स्वयंपाकघरात बनणारे पदार्थ आमच्या अभ्यासात होते. तोंडी परीक्षेला जाण्यासाठी सकाळी साडेतीन वाजता उठलो. स्वतःची चित्रफित बनवत मुद्गसूप (त्या काळात बनवली जाणारी मुगाची डाळ) बनवले आणि पुणे गाठले. माझ्या तोंडी परीक्षेसाठी वर्गात शिरलो ते डबा बाईंना देण्यासाठीच!
मल्लिनाथी रचता येणं म्हणजे संस्कृतपंडीत होणं या पारंपारिक विचाराने संस्कृतमधील प्रयोगशीलता नष्ट झाली आणि त्या बरोबरच संस्कृत मृत वाटू लागली. मल्लिनाथी मनातल्या भाषेत व्हायलाच हवी आणि प्रकट व्हायला हवी ती, कृती! हे ज्यांनी जाणलं तेच खऱ्या अर्थी भाषेचे अभ्यासक होऊ शकले.

कारण, शब्दांचे रीघ रचत विषयांवर खल करणं अगदीच सोपं असतं. प्रत्यक्षात काम करायची वेळ आल्यावर अनेकांचं शेपूट आत गेलेलं असतं. शेवटी, बोली भाषा हे संवादाचं अधमतम माध्यम आहे; जेव्हा ती उत्तम होते तेव्हा साहित्य निर्माण झालेले असते. संवाद बहिरावयवांपासून परेपर्यंत पोहचलेला असतो. माणसाने बोलण्यातून व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला शिकायला हवं.

हे जितकं अभ्यासाच्या बाबतीत खरं आहे तितकं व्यावहारीक जगातही तसं वर्तन करता यायला हवं. आज स्वतःची भाषा सोडून इतरांना समजावं म्हणून परकीय भाषांना दिले जाणारे महत्त्व यामुळे गौण करता येऊ शकेल. स्वतःची भाषा स्वतःला ओळखता यायला हवी. तीत स्वतः पारंगत व्हायला हवं. भाषा उसनी घेऊन तिच्यात कधी अभिव्यक्त होता येत नाही. परिपूर्ण अभिव्यक्ती ही स्वतःच्याच भाषेत होत असते.

संस्कृत भाषा शिकायला सुरूवात करून तपोपूर्ती होत असल्याची जाणीवही खूप सुखावते आहे. भाषेवर असंख्य प्रयोग करायचे आहेत. भाषेतले असंख्य प्रयोग कृतीरूपात आणायचे आहेत. संस्कृतला बोलतं करायचं आहे, प्रयोगांतून! इंग्रजीचा तिरस्कार करत जिच्याकडे वळलो. तिने मला भाषेवर प्रेम करायला शिकवलं. भाषेला भाषेचं बंधन नसतं हा संस्कार करविला. असंख्य विरोध झेलंत हा भाषेचा प्रवास चालू आहे.
असो, कृतिशीलता बरंच काही बोलून जाते...
निष्क्रीय यू.जी.सी.च्या अधिपत्याखाली राहून पुणे विद्यापीठाच्याही विस्मरणात गेलेले यः क्रियावान् स पण्डितः। असे विद्यापीठाचे बोधवाक्य विद्यार्थ्यांच्याच प्रयोगांतून उलगडता येऊ शकते हेच खरे...
-सम्प्रिः।

४ टिप्पण्या:

  1. भाऊ व्यवस्थेला नावं ठेवण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच असतो जेव्हा आपण ती विधायकतेसाठी बदलण्याकरिता कृतिशील असतो आणि महत्वाचे म्हणजे त्या व्यवस्थेचे भाग बनून मग ती बदलण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थेचा भाग बनण्याकरीता व्यवस्थेच्या विहित पात्रता आत्मसात करणे क्रमप्राप्त असते. कृतिशीलतेला अभ्यासशीलतेची (आणि अतिमहत्वाचे म्हणजे कागदांची) जोड हवीच. (आणि हे मी अनुभवातून सांगतोय. मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी 7 वर्षे गुरुकुलात फक्त अभ्यासासाठी अभ्यास केलाय खरा, पण नंतर कागदांच्या समिधा गोळा करत आणखी 7+ वर्ष घालवतच आहोत ना! आणि फळ पण मिळतंय ना त्याचे.) तेव्हा नावं ठेवणं थांबवावंस असं मला वाटतं.
    बाकी तुझा लेख आवडला, भाषाशैली आवडली.
    इतर लोक वा वा वैगेरे म्हणतीलच तेव्हा ते मी जास्त करत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझं म्हणणं अगदी पटतं आहे. आयुष्यात 'आर्थिक स्थिरता' वगैरे हवी असेल तर पदव्यांची रद्दीच सोपा मार्ग दाखवेल.
      पण, संदीप एकंच आहे. बाकीच्यांना दोन पदव्यांसाठी एकावेळी नोंदणी करायची म्हणजे असंख्य नियम आडवे येतात. हे तू नाकारू शकणार नाहीस.
      तसं घरातही स्पष्ट केल्याने प्रकट बोलणं मला कठीण जाणार नाही.माझी बौद्धिक पात्रता नाही नेट वगैरे उत्तीर्ण होण्याची. त्यामुळे परीक्षांसाठी सरकार दरबारी हजार हजार रूपये वाया घालवणे बंद करायचे ठरवले आहे. परीक्षा अनुत्तीर्ण राहील्यामुळे माझ्या शिकवण्याच्या क्षमता न्यून होत नाहीत. फक्त विद्यापीठाची चाकरी करण्याचे मार्ग बंद होतात. आम्हास समाविष्ट करवून घेण्याचे प्रयत्न व्यवस्थेतील कृतिशीलांनी करावेत. आम्ही व्यवस्थे साठी काम न करता विषयांसाठी काम करत आहोत.

      हटवा
  2. मी संदीप सागरच्या मताशी सहमत आहे. आणि गंधार ,जर तू विषयासाठी काम करत असशील तर ते व्यवस्थेला नावं न ठेवता सुद्धा अगदी सहजपणे करू शकतोस ! नामानिराळं राहून जेव्हा असंख्य लोक त्यांची "कृतिशीलता" दाखवतात तेव्हा'च' देश चालतो. बाकी सुज्ञांस सांगणे न लगे. लेख (मुख्यतः भाषा) बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुसह्य केल्याबद्दल अभिनंदन :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कसंय आयुष्यभर सहन करण्याची वृत्ती आधीपासूनच माझ्यात नाही! बंडखोरपणा रुजलेला आहे. तो बहरतो आहे. आपणा सरखे सात-आठ वेळा नेटच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले जेव्हा त्या रद्दीची खिरापत जमा करतात तेव्हा परीक्षांची कीव आल्यावाचून राहत नाही. असो, माझी मतं ठाम होत गेली आहेत ती संघर्षांतूनच! ती बदलण्यासाठी सकारात्मक तात्पर्ये जोवर दिसत नाहीत तोवर चर्चा व्यर्थ आहे.
      जोवर लिखित मजकूर पालकांना सुसह्य होतो आहे तोवर मी अगम्य नाहीये.

      हटवा