झिम्मा चित्रपटाला माझ्याकडून
तीन तारे!
एका उत्तम कथावस्तूचे, विषयाचे दिग्दर्शकाने, संगीत संयोजकाने तीनतेरा वाजवल्यामुळे पाचातून उणे दोन.
हा संपूर्ण चित्रपट केवळ अभिनेता आणि अभिनेत्रींच्या उत्तम अभिनयाने उचलून धरला आहे. म्हणून नट आणि नटींना अभिनयासाठी पाचपैकी पाच तारे!
का बघावा? अभिनय आणि विषयासाठी, हासण्यासाठी!
नव्या दिग्दर्शकाला प्रोत्साहन देण्यासाठी...
विषय तसा गंभीर आहे, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाला भिडणारा आहे, सहृदय पुरुषांना विचार करायला लावणारा आहे, समाज घडवणारा आहे, महिलांना समजून घेणारा आहे, अभिनेत्रींच्या माध्यमांतून विविध वयोगटातल्या, विविध सांसारिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांचे मन बोलतं करणारा आहे. म्हणून नाव झिम्मा! अर्थातच हसत खेळत एकमेकींचे मनं उलगडणारा पारंपारिक खेळ.
कथा सुरूच होते विविध भारतीय घरांमधून. तिथून इंग्लंडला पोहचेपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, चित्रपटाच्या परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जातो.
त्यानंतरचा चित्रपट इंग्लंडदर्शन घडवतो. तिथे पोहचल्यावर हास्य-करुण-वीर रसांमध्ये कथा गुंफली आहे.
हास्य रसाला साद घालायच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी दिग्दर्शकाकडून विषय हातचा सुटला आहे किंवा गंभीरता दाखवण्याच्या नादात रसभंग तरी केला आहे.
चित्रपटाचा शेवट वीररसाने होतो. व्हाॅट्सअॅप संवादांचा खूप परिणामकारक उपयोग दिग्दर्शकाने इथे केला आहे. मनाची धीटाई, दृढनिश्चयता दाखवण्यात एकूणच "बरे" यश आले आहे. मध्ये अनेकदा विषय सुटल्याने शेवटी- पूर्णतेच्या पट्टीवर वीरतेला पाऊण न्याय देता आला आहे.
जिथे विषय हातचा सुटला ते प्रसंग वेगळ्या प्रकारे, वेगळी दृष्य दाखवत अधिक खुलवता आले असते. प्रेक्षकांना समरस करवून घेण्यात कुठेतरी दिग्दर्शक मागे पडला आहे. "बघतोस काय मुजरा कर" नंतर दिग्दर्शकाचा दुसराच चित्रपट असल्याने बऱ्याच चुका क्षम्य आहेत. त्यामानाने त्याने खूप मोठी उडी मारली आहे.
पार्श्वसंगीताचे काम -दृश्य चित्रांबरोबर अदृष्ट मानवी भावना प्रेक्षकांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवण्याचे असते. चित्रपटातील अनेक मूक भांगांना अभिनायाने खुलवले खरे, पण त्याबरोबर संगीत असते तर तेच मनाला भिडले असते, डोळे पाणावून सोडले असते. ते राहून गेले आहे.
संपूर्ण चित्रपटात सतार, बासरी इत्यादि भारतीय वाद्यांचे तुकडे आहेत. पण, ते विषयाला सुसंगत असतीलच याचा काही नेम नाही.
पारंपारिक झिम्मा काव्य साहित्यला आधुनिक साद चित्रपटाच्या माध्यमातून घालता आली असती. पण त्याजागी आधुनिक गीत प्रकार टाकायचा अट्टहास केलेला दिसतो.
एकूण चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखाच आहे. कारण, स्त्रीवर्गाच्या मनाचा थारा घेण्याचे, पुरुषवर्गाचे कान टोचण्याचे, पॅडविषयी खुलेपणाने बोलून जनजागृतीचे काम विषयाने आणि अभिनयाने हसवत हसवत-गंभीर बनवत केले आहे.
तेव्हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट नक्की बघा.
-गंधार
तुझ्या निरीक्षणांशी पूर्ण सहमत आहे,संगीताची साथ असती तर नक्कीच परिणाम उत्कट झाला असता,तरी चित्रपट नक्कीच आनंददायी आहे.
उत्तर द्याहटवा